आधी क्रिकेट, नंतर मनोरंजन आणि आता राजकारण अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या नवज्योतसिंगं सिद्धू यांनी राजकारणात देखील काँग्रेस, भाजपा, काँग्रेस असा वावर ठेवला आहे. सध्या नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेसमध्ये असून त्यांचं नाव पंजाबच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे. पंजाबमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चा जोर धरू लागलेल्या असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना आत्तापासूनच लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी तर नवज्योतसिंग सिद्धू यांना थेट भरकटलेल्या मिसाईलचीच उपमा दिली आहे!

“ते स्वत:वरही हल्ला करू शकतात!”

सुखबिरसिंग बादल यांनी पंजाबला अशा व्यक्तीची नसून राज्याच्या विकासाविषयी विचार करणाऱ्या व्यक्तीची गरज असल्याचं म्हटलं आहे. “नवज्योतसिंग सिद्धू हे एक भरकटलेलं मिसाईल आहे. या मिसाईलवरचं नियंत्रण सुटलेलं आहे. हे मिसाईल कुठल्याही दिशेने जाऊ शकतं. ते स्वत:वरही आघात करू शकतं. आज पंजाबला अभिनय करणाऱ्या व्यक्तीची नसून राज्याच्या विकासाविषयी विचार करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे”, असं सुखबिरसिंग बादल म्हणाले आहे. त्यामुळे पंजाबमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हळूहळू राजकीय ज्वर चढू लागला असून लवकरच इथे निवडणुकांसाठीचं राजकीय वातावरण तयार होऊ लागेल असं चित्र दिसून येत आहे.

 

तुमच्या भ्रष्ट व्यवसायांसाठी मी टार्गेटेड!

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील सुखबिरसिंग बादल यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “तुमचे भ्रष्ट व्यवसाय उद्ध्वस्त करण्यासाठी मी गाईडेड आणि पूर्णपणे केंद्रीत आहे. जोपर्यंत पंजाबमध्ये बनलेले तुमचे सुखवस्तू आवास हे पंजाबच्या गरीबांसाठी सार्वजनिक शाळा आणि हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत होत नाहीत, तोपर्यंत मी झुकणार नाही”, अशी प्रतिक्रिया नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिली आहे.

 

दरम्यान, एका ट्विटर युजरने लागलीच सुखबीर सिंग बादल यांच्या टीकेवरून मीम्स बनवून एएनआयच्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे!

 

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह: नवज्योतसिंग सिद्धूंनी घेतली प्रियंका गांधींची भेट

पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला अंतर्गत मतभेदांचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी सातत्याने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात भूमिका घेतली असून अमरिंदर सिंग यांनी देखील नवज्योतसिंग सिद्धू यांचं राजकीय वजन फार वाढणार नाही, याची काळजी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रियांका गांधी यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.