Sundar Pichai’s Chennai Home Sold : जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन असलेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे भारतातील घर अखेर विकले गेले आहे. चेन्नईच्या अशोक नगर येथे सुंदर पिचाई यांचं घर होतं. याच घरात सुंदर पिचाई यांचा जन्म झाला. याच घरात त्यांचं बालपण गेलं. तेच घर आता विकण्यात आलं आहे. तामिळ सिनेमा अभिनेते आणि निर्माते सी मनिकंदन यांनी हे घर खरेदी केले आहे.
सुंदर पिचाई यांची आई लक्ष्मी या पेशाने स्टेनोग्राफर होत्या. तर, वडील रघुनाथ पिचाई हे इलेक्ट्रिकल इंजीनिअर. हे पिचाई दाम्पत्य चेन्नई येथील अशोक नगर येथे राहत होते. सुंदर पिचाई यांचं बालपणही याच घरात गेले. आता पिचाई यांचं हे वडिलोपार्जित घर तामिळ अभिनेते सी मणिकंदन यांनी विकत घेतले आहे. घराचे कागदपत्रे मणिकंदन यांना सुपूर्द करताना सुंदर पिचाई यांचे वडील रघुनाथ पिचाई भावूक झाले होते. कारण, ही त्यांची पहिलीच संपत्ती होती. मणिकंदन म्हणाले की, “सुंदर पिचाई हे आपल्या देशाची शान आहेत. त्यामुळे ते जिथे राहायचे ते घर विकत घ्यायचं माझ्यासाठी गौरवपूर्ण आहे.”
बिजनेस टुडेच्या वृत्तानुसार, पिचाई त्यांचं हे वडिलोपार्जित घर विकण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून प्रयत्न करत होते. पिचाई यांचे वडील गेले काही वर्षं अमेरिकेत राहत होते, त्यामुळे घरविक्रीसाठी वेळ लागला. पिचाई यांनी जवळपास २० वर्षांहून अधिक काळ या घरात घालवला आहे. ऑक्टोबर २०२१ साली ते शेवटचे भारतात आले होते.
हेही वाचा >> “शाकाहारी टूथपेस्ट सांगून माशांच्या हाडांचा…”, जितेंद्र आव्हाडांचा पतंजली आणि रामदेव बाबांवर गंभीर आरोप, म्हणाले…
“सुंदर पिचाई यांच्या आईंनी मला कॉफी बनवून दिली. तर, त्यांच्या वडिलांनी पहिल्याच मिटिंगमध्ये मला घराची कागदपत्रे दिली. त्यांच्या आई-वडिलांच्या या स्वभावामुळे मी प्रभावित झालो आहे, असंही मणिकंदन म्हणाले. घराचे कागदपत्रे सुपूर्द करत असताना पिचाई यांचे वडिल भावूक झाले होते”, असंही मणिकंदन यांनी पुढे सांगितलं.
घराच्या कागदपत्रांसाठी पिचाई यांच्या वडिलांनीही रजिस्ट्रार कार्यलयात वेळ घालवला होता. घराची डिल पूर्ण होण्याआधी त्यांनी घरासंबंधित असलेले सगळे कर पूर्ण केले. सुंदर पिचाई यांच्यासारख्या लोकांनाही रजिस्ट्रार ऑफिसमध्ये थांबवून राहावं लागतं, ही खेदजनक बाब आहे, असंही मणिकंदन पुढे म्हणाले.