scorecardresearch

नागपूरनिर्मित राफेल विमानाच्या सुटय़ा भागांचा फ्रान्सला पुरवठा

राफेल या युद्ध विमानाच्या पाच वेगवेगळय़ा भागांची निर्मिती नागपूरच्या मिहानमधील कारखान्यात केली जात आहे.

नागपूरनिर्मित राफेल विमानाच्या सुटय़ा भागांचा फ्रान्सला पुरवठा

फ्रान्सचे महावाणिज्यदूत शेव्हरले यांच्याकडून माहिती 

नागपूर : राफेल या युद्ध विमानाच्या पाच वेगवेगळय़ा भागांची निर्मिती नागपूरच्या मिहानमधील कारखान्यात केली जात आहे. हे सुटे भाग केवळ भारतासाठी नव्हे तर जगभरातील राफेल विमानासाठी वापरण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्यदूत जेन मार्क सेरे शेव्हरले यांनी दिली. शेव्हरले नागपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दसॉल्त रिलायन्स एरोस्पेस लिमिटेडला भेट दिली. माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत त्यांनी फ्रान्स आणि भारत यांच्यातील व्यापारसंबंध, गुंतवणूक यावर सविस्तर चर्चा केली.

मिहानमध्ये दसॉल्त रिलायन्स एअरोस्पेस लि.चा कारखाना आहे. दसॉल्त एव्हीएशन (फ्रान्स) आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लि.(इंडिया) यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. येथे राफेलचे कॉकपीट तयार होत असल्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, राफेलचे वेगवेगळे पाच भाग तयार केले जात आहे. ते सुटे भाग फ्रान्सला पाठवले जातात. तसेच इतर ठिकाणांहून या विमानाचे सुटे भाग फ्रान्सला आणले जातात. त्यानंतर तेथे विमानाची बांधणी केली जाते. नागपुरात तयार होत असलेले राफेलचे सुटे भाग केवळ भारतातील विमानांसाठीच नाहीतर जगभर जेथे कुठे राफेल आहेत तेथे या सुटय़ा भागांचा उपयोग केला जातो. फ्रान्सकडून भारताने राफेल युद्ध विमानांची खरेदी केली. त्यावेळी झालेल्या करारानुसार भारतात त्या विमानाच्या काही भागाची निर्मिती केली जात आहे. ‘ऑपसेट क्लॉझ’ नुसार फ्रान्सच्या दसॉल्त या कंपनीने रिलायन्स कंपनीला फॉल्कन विमान, हेलिकॉप्टर, इतर उपकरणे बनवण्याचे तसेच देखभाल-दुरुस्तीचे काम दिले आहे.

नागपुरात फाल्कनची बांधणी शक्य

फाल्कन २००० या प्रवासी विमानाचे विविध भाग मिहान नागपुरातील दसॉल्त रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (द्राल) कारखान्यात तयार केले जात आहेत.  फाल्कन-२००० या विमानास आवश्यक संपूर्ण सुटे भाग नागपुरात तयार होऊन येथेच विमानाची बांधणी करण्यास वाव आहे. संबंधित कंपन्यांना त्यावर निर्णय घ्यायचा आहे, असे शेव्हरले म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या