पीटीआय, पोर्ट ऑफ स्पेन
पायाभूत सुविधा आणि औषधनिर्माणसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारताने त्रिनिदाद अँड टोबॅगो देशाबरोबर शनिवारी सहा करारांवर स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांच्यातील चर्चेनंतर हा करार अंतिम झाला. तत्पूर्वी, त्रिनिदाद अँड टोबॅगोने विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताला पूर्ण पाठिंबा दर्शविला.
पंतप्रधान मोदी आणि बिसेसर यांनी संरक्षण, शेती, आरोग्यसेवा आणि डिजिटल परिवर्तन, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) आणि क्षमता बांधणी या क्षेत्रातील संभाव्य सहकार्याबद्दल चर्चा केली. या सहा सामंजस्य करारांमुळे दोन्ही देशांदरम्यान औषधनिर्माणशास्त्र, जलद-प्रभाव प्रकल्प, संस्कृती, क्रीडा आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रातील सहभाग वाढणार आहे.
त्रिनिदाद अँड टोबॅगोनंतर पंतप्रधान शनिवारी अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स येथे दाखल झाले.
भारत, त्रिनिदाद अँड टोबॅगो यांच्यातील मैत्रीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. अध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू, पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर तसेच या अद्भुत देशाचे सरकार आणि नागरिकांचे मी आभार मानतो. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान