वस्तू आणि सेवा विक्रीसाठी हिंदू देवदेवता अथवा धार्मिक ग्रंथांच्या नावांचा वापर करता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकारच्या गोष्टींना मान्यता दिल्यास जनतेच्या संवेदनक्षमतेवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो, असे न्या. रंजन गोगोई आणि न्या. एन. व्ही. रामन यांच्या पीठाने म्हटले आहे.
रामायण, कुराण, बायबल, गुरू ग्रंथ साहिब असे अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. एखादी व्यक्ती वस्तू अथवा सेवाविक्रीसाठी अशा धार्मिक ग्रंथांचा ट्रेडमार्क म्हणून वापर करू शकते का, या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे, असेही पीठाने स्पष्ट केले आहे. देवदेवतांच्या नावांचा वापर उत्पादनाची विक्री करण्यासाठी करता येणार नाही असे कायदा सांगतो, असेही पीठाने स्पष्ट केले आहे.
पाटणा येथील लालबाबू प्रियदर्शी यांनी उदबत्त्या आणि सुंगधी द्रव्ये यांच्या विक्रीसाठी ‘रामायण’ हा ट्रेडमार्क वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका केली होती, त्या वेळी पीठाने वरील बाब स्पष्ट केली. ‘रामायण’ या धार्मिक ग्रंथाचा वापर ट्रेडमार्क म्हणून करता येणार नाही कारण ती एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी होऊ शकत नाही, असा निर्वाळा एका मंडळाने दिला होता त्याविरुद्ध प्रियदर्शी यांनी याचिका केली होती.
धार्मिक ग्रंथाचा ट्रेडमार्क म्हणून वापर करण्यास कायद्याने बंदी नाही आणि त्यामुळे हिंदूंच्या कोणत्याही घटकांचा अवमान त्यामुळे होतो असा कोणताही पुरावा नाही, असा युक्तिवाद प्रियदर्शी यांनी केला होता. तथापि, कोणत्याही व्यक्तीला नफा मिळविण्यासाठी देवदेवता अथवा धार्मिक ग्रंथांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार देता येणार नाही, हा युक्तिवाद पीठाने मंजूर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court gods religious texts can not be trademarked
First published on: 25-11-2015 at 03:17 IST