औषध उपचारांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद या रामदेवबाबांच्या कंपनीला झापलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पतंजली आयुर्वेदकडून हे आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही कुठल्याही भ्रामक जाहिराती प्रसारित करणार नाही तरीही अशा जाहिराती का दिल्या जात आहेत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. तसंच तुमची औषधं चांगली आहेत, सर्वोत्तम आहेत हा दावा कशाच्या आधारे करत आहात? सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला खडे बोल सुनावले आहेत.
पतंजली आयुर्वेद आणि आचार्य बालकृष्णन यांना नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पतंजली आयुर्वेद आणि कंपनीचे प्रमुख संचालक आचार्य बालकृष्ण यांना नोटीस धाडली आहे. न्यायालयाच्या अपमान केल्या प्रकरणी तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. तसंच या प्रकरणात आदेशाचं पालन करण्यात आलं नाही तर एक कोटी रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. कोर्टाने वारंवार इशारा देऊनही तुमची औषधं रासायनिक औषधांपेक्षा चांगली आहेत असा दावा पतंजली कुठल्या आधारे करत आहे? असाही प्रश्न न्यायालयाने विचारला. याबाबत सरकारच्या आयुष मंत्रालयाला प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही या कंपनीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर काय कारवाई केली ते सांगा? त्यावर सरकारतर्फे आम्ही याबाबतचा डेटा गोळा करतो आहोत हे सांगण्यात आलं. केंद्र सरकारच्या या उत्तरावरही सर्वोच्च न्यायालायने नाराजी दर्शवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद या कंपनीला त्यांच्या उत्पादनांचं ब्रांडिंग करण्यापासूनही रोखलं आहे. आम्ही आजार बरे करु शकतो असा दावा तुम्ही कुठल्याही जाहिरातीत करु शकत नाही. अशा प्रकारच्या जाहिराती त्वरित थांबवल्या जाव्यात असं न्यायालयाने म्हटलं आहे. Live Law ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे जी याचिका दाखल केली गेली आहे त्यावर सुनावणी करताना पतंजली आयुर्वेद या कंपनीला फटाकरालं आहे. फसव्या जाहिराती प्रसारित करु नये असंही न्यायालयाने म्हटलं आहे.