नवी दिल्ली : मध्य प्रदेश पोलिसांच्या कोठडीत देवा पारधी या संशयिताच्या मृत्यूप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात अपयश आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय अन्वेषण विभागावर (सीबीआय) ताशेरे ओढले. देवा पारधी याचा पोलीस कोठडीत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा दावा मध्य प्रदेश पोलिसांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी आपल्या मुलाचा छळ केला आणि त्याला मारून टाकले असा आरोप मृत देवाच्या आईने केला आहे.

२६ वर्षीय देवाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या संजीव सिंह मावई आणि उत्तम सिंह कुशवाह या पोलीस अधिकाऱ्यांना एका महिन्याच्या आत अटक करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १५ मे रोजी दिले होते. मात्र, त्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप मृत देवाच्या आईने अवमान याचिकेत केला आहे. त्यावर न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

देवा पारधीचे काका गंगाराम पारधी हे या प्रकरणाचे एकमेव प्रत्यक्षदर्शी असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना काहीही झाले तर आम्ही सीबीआयला जबाबदार धरू, असा इशारा न्यायालयाने दिला. गंगाराम पारधी यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यास तुरुंग अधिकाऱ्यांना सांगा, असे निर्देश न्यायमूर्तींनी दिले.

इतर प्रकरणांमध्ये सीबीआय काही सेकंद किंवा काही मिनिटांमध्ये संशयितांना अटक करू शकते. पण या प्रकरणात ते स्वतःच्या लोकांना अटक करू शकत नाहीत, अशी टिप्पणी न्या. नागरत्ना यांनी केली.

हे असे चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही तुम्ही (सीबीआय) कृती करण्यास अक्षम आहात. मग काय उपयोग आहे? तुम्ही हतबलता दर्शवत आहात. “तो फरार आहे, आम्ही त्याचा माग काढू शकत नाही असे तुम्ही जाहीर करत आहात”, कृपया हतबलता दाखवू नका. – न्या. बी. व्ही. नागरत्ना