सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. Prostitute, Hooker, Whore, Keep, Mistress, Slut असे चाळीस शब्द आपल्या नव्या हँडबुकमधून वगळले आहेत. कुठल्याही न्यायालयांना निर्णय देत असताना हे शब्द आता यापुढे वापरता येणार नाहीत. फक्त इंग्रजी शब्दच नाहीत तर या शब्दांचे अर्थ, समान अर्थ असलेले शब्दही न्यायालयाच्या निर्णयांमध्ये वापरता येणार नाहीत. असे शब्द वापरुन लैंगिक पूर्वग्रह वाढीस लागणं होऊ नये आणि न्यायाधीशांनी न्यायदान करताना संवेदनशीलपणे निर्णय द्यावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी सकाळी हँडबुक ऑफ कॉम्बेटिंग जेंडर स्टीरिओटाइप्स हे नवं हँडबुक प्रकाशित केलं. त्यावेळी आधीच्या न्यायालयीन निर्णयांमधले रुढ झालेल्या या शब्दांवर त्यांनी भाष्य केलं. हे शब्द चुकीचे आहेत. न्यायालयाच्या निकालांमध्ये महिलांविषयी Prostitute (वेश्या), Concubine(रखेल) Hooker, Whore, Keep, Mistress, Slut हे शब्द वापरले जाणं हे त्यांचा अपमान करणारं आहे. आता आपण जे नवं हँड बुक आणलं आहे त्यातून हे शब्द वगळण्यात आले आहेत. या हँड बुकचा उद्देश जुन्या निर्णयांवर टीका करणं हा नाही. आपण नकळतपणे न्यायदान करताना लैंगिक रुढी नकळतपणे कशा जपत आलो आहोत हे होऊ नये म्हणून असे चाळीस शब्द वगळण्यात आले आहेत असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
रूढ झालेले हे शब्द वापरून आपण इतके दिवस न्यायदानाची प्रक्रिया राबवत होतो. यापुढे आपण अधिक संवेदनशीलपणे काम करु असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. तसंच न्यायदान करताना कुठल्याही न्यायाधीशाने रुढीवादी धारणा मनात ठेवून न्यायदान केलं जाऊ नये. यामुळे समाजात ज्या चुकीच्या रुढी चालत आल्या आहेत त्यांना एकप्रकारे चालना दिली जाते आहे. faggot, dutiful wife, obedient wife असे ४० शब्द नव्या हँडबुकमधून वगळण्यात आले आहेत.