Supreme Court dismissed Kangana Ranaut Petition : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत यांना शेतकरी आंदोलनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका परत घ्यावी लागली आहे. कारण न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. तसेच न्यायालयाने म्हटलं आहे की “आम्ही तुमच्या ट्वीटवर (एक्सवरील पोस्ट) कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही. ते काही साधारण रीट्विट नव्हतं. त्यामध्ये तुमची टिप्पणी देखील होती.”

कंगना रणौत यांनी २०२०-२१ मध्ये दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असताना या आंदोलनाबद्दल केलेल्या अपमानजनक टिप्पणीप्रकरणी पंजाबमधील न्यायालयात खटला चालू आहे. हा खटला रद्द करावा यासाठी कंगना यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

नेमकं प्रकरण काय? कंगना यांच्याविरोधात कोणी केलेली तक्रार?

पंजाबमधील बठिंडा येथील ७३ वर्षीय महिंदर कौर यांनी २०२१ मध्ये कंगना रणौत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत कौर यांनी म्हटलं होतं की कंपना यांनी शेतकरी आंदोलनाविरोधातील एक ट्वीट रीट्विट करत सर्व शेतकऱ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य केलं होतं. महिंदर कौर यांचा फोटो असलेलं ट्वीट रीट्विट करत कंगना म्हणाल्या होत्या की “ही तीच बिलकीस बानो आजी आहे जी शाहीन बाग आंदोलनात सहभागी झाली होती.”

तुम्ही मसाला टाकायचं काम केलं : न्यायमूर्ती विक्रम नाथ

न्यायमूर्ती विक्रम नाथ व संदीप मेहता यांच्या खंडपीठाने कंगना यांच्या याचिकेचा विचार करण्यास नकार दिला. न्यायालयाने कंगना यांना त्यांची याचिका मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी कंगना यांच्या रीट्विटमधील व मूळ ट्वीटमधील टिप्पणीवर आक्षेप घेतला. तसेच ते म्हणाले, “ते काही साधं रीट्विट नव्हतं. तुम्ही तुमची स्वतःची टिप्पणी देखील लिहिली आहे. तुम्ही त्यात मसाला टाकण्याचं काम केलं.”

कंपना यांचे वकील म्हणाले, “माझ्या आशिल कंगना रणौत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.” त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, “कनिष्ठ न्यायालयात स्पष्टीकरण देता येतं.” यावर वकील म्हणाले, “कंगना पंजाबमधील न्यायालयात उपस्थित राहू शकणार नाहीत.” यावर न्यायमूर्ती म्हणाले, “मग त्यांनी वैयक्तिक कारणं, जी काही असतील ती सांगून सूट मागावी.”

आम्हाला टिप्पणी करण्यास भाग पाडू नका : सर्वोच्च न्यायालय

कंगना रणौत यांचे वकील युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर न्यायमूर्तींनी त्यांना इशारा दिला की “कंगना यांना प्रतिकूल टिप्पणी सहन करावी लागू शकते. त्यांनी केलेल्या रीट्विटमधील व मूळ ट्वीटमधील मजकूरावर टिप्पणी करण्यास आम्हाला भाग पाडू नका. तसं केल्यास तुमच्या सुनावणीवर परिणाम होईल. तुमच्याकडे बचाव करण्यासाठी जे काही आहे ते वापरा.”