अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या दुर्घटनाप्रकरणी कोणीही मुख्य वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांना दोष दिलेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. याबाबतीत कोणतेही भावनिक ओझे बाळगू नका, असा सल्लाही न्यायालयाने कॅप्टन सभरवाल यांचे मुंबईस्थित ९१ वर्षीय वडील पुष्कराज सभरवाल यांना दिला.
एअर इंडियाच्या ‘एआय-१७१’ या ड्रीमलायनर विमानाने १२ जूनला उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटांत ते विमानतळापासून काही अंतरावर कोसळले होते. त्या अपघातात प्रवासी आणि काही नागरिकांसह एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली केली जावी अशी मागणी करणारी याचिका पुष्कराज सभरवाल आणि भारतीय वैमानिक संघाने दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या प्रकरणी खंडपीठाने केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांना नोटीस बजावली. तसेच प्राथमिक अहवालात सभरवाल यांना दोष दिला जाईल असे कुठेही सूचित केलेले नाही, असे खंडपीठाने सांगितले. यावेळी ‘विमान अपघात चौकशी ब्यूरो’च्या (एएआयबी) प्राथमिक अहवालाचा एक परिच्छेदही न्यायाधीशांनी वाचून दाखवला. यामध्ये केवळ सभरवाल आणि त्यांचे सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर यांच्यातील संभाषणाचा संदर्भ असल्याचे नमूद केले. गरज पडल्यास या दुर्दैवी दुर्घटनेबद्दल वैमानिकांना दोष दिला जाऊ नये असे न्यायालय स्पष्ट करेल, असेही न्या. कांत आणि न्या. बागची यांच्या खंडपीठाने सांगितले. ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी पुष्कराज सभरवाल यांची बाजू मांडली.
परदेशी माध्यमांवर टीका
अमेरिकेतील प्रतिष्ठित वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये नाव गोपनीय ठेवलेल्या सरकारी सूत्रांचा हवाला देत वैमानिकांना दोष दिला होता. त्यानंतर वैमानिकांना दोष देणे सुरू झाले, असे शंकरनारायणन यांनी न्यायलयाला सांगितले. त्यावर “हे केवळ भारताला दोष देण्यासाठी खोडसाळ वृत्तांकन होते. आम्हाला परदेशी माध्यमांच्या वृत्तांनी फरक पडत नाही. यात वैमानिकांचा दोष होता यावर देशातील कोणाचाही विश्वास नाही,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली. या वृत्तामुळे तुम्ही दुःखी झाला असलात तर तुम्ही अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल करू शकता, असा सल्ला न्या. बागची यांनी दिला.
सर्वप्रथम हा एक दुर्दैवी विमान अपघात होता. दुसरे, तुमच्या मुलाला दोष दिला जात आहे याचे तुम्ही स्वतःवर ओझे बाळगू नये. विमान कोसळल्याबद्दल वैमानिकाला दोष दिलेला नाही. तो एक अपघात होता. – सर्वोच्च न्यायालय
