नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रा. जी. एन. साईबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी आज पार पडली.
हेही वाचा – Video : नावाला पोलीस अधिकारी, पण केला भलताच कारनामा; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढत, या निर्णयात त्रुटी असल्याचे म्हटले. तसेच आरोपींची मुक्तता करताना गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्यात आला नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रा. साईबाबा यांना गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. याप्रकरणाचा निकाल देताना उच्च न्यायालयाने पुराव्या अभावी साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली होती.