लोकसभा निवडणुकांसाठीचा मतदानाचा पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर आला आला. यंदा सर्वच पक्षांनी कमी अधिक प्रमाणात आपल्या विद्यमान खासदारांना तिकीट दिले आहे तर काही ठिकाणी नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘परिवर्तन’ या संस्थेने देशातील खासदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार केले. यामध्ये सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणारे खासदार, सर्वाधिक उपस्थिती असणारे खासदार, सर्वाधिक खासदारनिधी खर्च करणारे खासदार अशी यादीच ‘परिवर्तन’ने तयार केली आहे.

‘परिवर्तन’ने जारी केलेल्या या ‘रिपोर्ट कार्ड’मध्ये लोकसभेतील विविध चर्चांमध्ये विविध विधेयकांवर प्रश्न सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या खासदारांनी बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. ५७१ खासदारांपैकी सर्वाधिक प्रश्न विचारणारे पाचही खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. त्यातही अव्वल तीन खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. सुप्रिया सुळे यांनी २०१४ ते २०१९ काळात सर्वाधिक म्हणजे ११९२ प्रश्न विचारत या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर धनंजय महाडिक (११८२ प्रश्न) तर तिसऱ्या क्रमांकावर विजयसिंह मोहिते पाटील (११४१ प्रश्न) आहेत. काँग्रेसचे राजीव सातव (११२६ प्रश्न) चौथ्या तर शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील (११०७ प्रश्न) हे या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत.

एकंदरितच या आकडेवारीवरुन प्रश्न विचारण्यात महाराष्ट्रातून निवडूण गेलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे असंच दिसतं आहे.