पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केलं. मणिपूरमधील हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार कोणतीचं पावलं उचलतं नाहीये, यामुळे विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मणिपूर प्रश्नावर पंतप्रधान मोदींनी बोलावं, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. या अविश्वास प्रस्तावावर आज मोदींनी सभागृहात संवाद साधला. यावेळी केलेल्या भाषणातून मोदींनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दीड तासांच्या भाषणातील ९० टक्के वेळ केवळ विरोधकांच्या ‘इंडिया’आघाडीवर बोलले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. त्या ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलत होत्या.

हेही वाचा- “काँग्रेसशी जोडलेली प्रत्येक गोष्ट चोरीची”, पक्षचिन्हासह झेंड्याबाबत पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

पंतप्रधान मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींना आम्ही ऐकू इच्छित होतो. ते अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी किंवा मणिपूरवर बोलतील, अशी आम्हाला अपेक्षा होती. त्यांनी मणिपूरमधील भगिनींबाबत बोलावं, त्यांच्यावर झालेल्या अत्याचारावर बोलावं, अशी आमची इच्छा होती. पण ते दीड तासांच्या भाषणातील ९० टक्के वेळ ‘इंडिया’ आघाडीवर बोलले.”

नरेंद्र मोदी ‘इंडिया’बाबत काय म्हणाले?

विरोधी पक्षाची समस्या ही आहे की, त्यांना स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी एनडीएचाच आधार घ्यावा लागला आहे. पण सवयीनुसार गर्वाचा ‘आय’ यांना सोडत नाही. त्यामुळे एनडीएमध्ये गर्वाचे दोन ‘आय’ अक्षरं टाकली आहेत. पहिला आय २६ पक्षांचा गर्व आणि दुसरा आय एका कुटुंबाचा गर्व. एनडीएही चोरला आणि इंडियाचेही तुकडे केले, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

हेही वाचा- “विरोधकांना गुप्त वरदान मिळालंय, ते ज्याचं…”, सभागृहात पंतप्रधान मोदींची तुफान टोलेबाजी

विरोधकांचं नामप्रेम आजचं नाही, अनेक दशकांपासूनचं आहे. त्यांना वाटतं नाव बदलून देशावर राज्य करता येईल. गरीबाला चहूबाजूला त्यांचं नाव दिसतं, पण त्यांचं काम कुठेच दिसत नाही. रुग्णालयात नावं त्यांची आहेत, पण उपचार नाहीत. शिक्षण संस्था, रस्ते, उद्याने, योजना, क्रीडा पुरस्कार, विमानतळे, संग्रहालये यांना त्यांची नावं आहेत. पण त्या योजनांमध्ये त्यांनीच हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. समाजाच्या शेवटच्या स्तरावर उभा व्यक्ती काम होताना पाहू इच्छितो. पण त्याला फक्त या कुटुंबाचं नाव मिळालं, असंही मोदी सभागृहात म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule reaction on pm narendra modi speech in loksabha no confidence motion rmm
First published on: 10-08-2023 at 20:22 IST