Supriya Sule Speech at Lok Sabha Session : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (२७ जुलै) लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी त्या ठिकाणी नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलाला त्यांनी सलाम केला. पहलगाम हल्ल्याला ९० दिवस झाले आहेत, असं सांगून त्यांनी पहलगामबरोबर राजोरी, पुंछमधील हल्ल्यांचीही आठवण करुन दिली.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी लोकसभेत केलेल्या दाव्यांची पोलखोल केली. त्या म्हणाल्या, “भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी लोकसभेत चुकीची वक्तव्ये केली आहेत. ते म्हणाले होते की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधीही सैन्यदलाला प्रोत्साहित केले नाही किंवा त्यासाठी काहीच केले नाही. पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच भारतीय सैन्याने उत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या भारत-पाक युद्धात भारताला अपयश आलं होतं. त्यांचं हे वक्तव्य आत्तापर्यंत आपल्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान आहे.”
सुप्रिया सुळे यांनी तेजस्वी सूर्या यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध केला. त्या म्हणाल्या, “पाकिस्तानबरोबर आपण पहिल्या युद्धात कमी पडलो असं तेजस्वी सूर्या सांगत होते. त्यांचा इतिहास जरा कच्चा आहे. त्यांना इतिहास सांगते. कारण हे नवे लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात. कदाचित अंधभक्त वगैरे असतील.”
सुप्रिया सुळेंनी वाचून दाखवली भारतीय लष्कराची यशोगाथा
- पहिलं इंडो-पाक युद्ध – भारताचा विजय
- ऑपरेशन पोलो (१९४८) – हैदराबादचं भारतात विलिनीकरण झालं.
- ऑपरेशन विजय (१९६१) – गोवा मुक्तीसंग्राम. पोर्तुगीजांविरोधातील लढाई जिंकून दिव-दमन व गोव्याचं भारतात विलिनीकरण
- इंडो-पाक युद्ध (१९६५) – पाकिस्तानच्या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने आपल्या सीमा सुरक्षित राखल्या.
- बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध, ऑगस्ट-सप्टेंबर (१९७१) – मुक्तवाहिनीबरोबर मिळून भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानशी दोन हात केले. भारताने हे युद्ध जिंकलं. ९० हजार पाकिस्तानी सैनिक भारताला शरण आले. १३ दिवसांत आपण बांगलादेश स्वतंत्र केला.
वरील यादी वाचून दाखवत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तेजस्वी सूर्या शिकले नसतील, त्यांचा इतिहास कच्चा असेल तर त्यांनी इतिहास वाचावा. अन्यथा मी माझ्याकडील माहिती पुरवते.”