करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याचं चित्र असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतं आहे. देशात करोनाचं डबल म्युटेशन आढळून आलं असून, त्यामुळे करोना संक्रमणाचा प्रसार वेगानं होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. दुसरीकडे देशात झालेल्या करोना उद्रेकामुळे अनेक देश सर्तक झाले असून, अमेरिकेन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने सावधगिरीचा इशारा अमेरिकनं नागरिकांना दिला आहे. भारतात करोना उद्रेक झाल्यामुळे नागरिकांनी भारताचा दौरा करणं टाळावं, असं संस्थेनं म्हटलं आहे. पूर्णपणे लसीकरण झालेलं असलं तरीही संसर्ग होण्याचा व विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतात जाणं टाळावं. जर जाणं अत्यावश्यक असेल, तर आधी पूर्णपणे लसीकरण करून घ्यावं,” असा सल्ला रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने अमेरिकन नागरिकांना दिला आहे.

सध्या भारतातील परिस्थिती कशी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. सोमवारी आतापर्यंतची सर्वात उच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली. देशात २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. तर १,६१९ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात ५८ हजार ९२४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीतील परिस्थिती ढासळली असून, केजरीवाल सरकारने तातडीने एका आठवड्याचा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील काही शहरांत लॉकडाउन लागू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर गुजरातमध्येही परिस्थिती बिकट आहे. चिंतेची बाब म्हणजे निवडणूका सुरु असलेल्या राज्यात आता करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.