पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला बदला म्हणून जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी संसदेवर हल्ला करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकात यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले होते. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून भारतात घातपात घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सीमेवर पाकिस्ताकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. तर दहशतवाद्यांनी आतापर्यंत काश्मीरमधील बारामुल्ला आणि हंदवाडा येथील लष्करी तळांवर हल्ला चढविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या  मसूद अझर भारतीय संसदेवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची कुणकुण भारतील लष्कराला लागली आहे. त्याची गंभीर दखल घेऊन देशभरातील गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यातही मसूद अझरचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि तिचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचा हात होता.
यापूर्वी गुप्तचर यंत्रणांना जैश ए मोहम्मदचे दहशतवादी ट्रक किंवा तत्सम मालवाहू वाहनांमधून दिल्लीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. काश्मीरच्या कुलगाम येथून हे दहशतवादी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले असून त्यांच्याकडे एके-४७ रायफल्स आणि इतर प्राणघातक शस्त्रे असल्याची माहिती होती. सप्टेंबर २०११ मध्ये इस्लाईली दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही.