एक्स्प्रेस वृत्त, बंगळूरु : मल्याळी अभिनेत्री तसेच मॉडेल सुहाना ही गुरुवारी तिच्या २२व्या जन्मदिनाच्या रात्री कोळिकोडे येथील तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. पतीनेच तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला असून पतीकडून तिचा छळ होत असल्याचा दावा केला आहे. सुहाना हिने गुरुवारी २२ वा वाढदिवस साजरा केला होता. त्याच रात्री तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पोलीस या मृत्यूचा तपास करीत असून तिचा पती सज्जात याला ताब्यात घेण्यात आले आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

सुहानाच्या आईने मातृभूमी न्यूजशी बोलताना आरोप केला की, माझी मुलगी कधीही आत्महत्या करू शकत नाही. तिचा खून करण्यात आला आहे. ती माझ्याकडे तक्रार करायची की, पती तिला मारझोड करतो तसेच पुरेसे खायलाही देत नाही. तिचा छळ केला जायचा. पोलिसांनी याचा तपास करून आम्हाला न्याय द्यावा, असे त्या म्हणाल्या. 

सज्जात हा पूर्वी कतारमध्ये नोकरीस होता. सध्या तो बेरोजगार आहे. अभिनयासाठी सुहाना हिला मिळणाऱ्या पैशांवरून तिचे पतीशी वाद होत असत, असे तपास अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. सज्जात याने दावा केला आहे की, ती त्याला स्नानगृहात मृतावस्थेत आढळली. हे पती-पत्नी राहात असलेल्या घराच्या मालकाने सांगितले की, सज्जातच्या हाका ऐकून मी तेथे गेलो असता मला ती त्याच्या मांडीवर दिसून आली. ती कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे त्याने सांगितले. आम्ही पोलिसांना कळवल्यावर ते पाचच मिनिटांत तेथे पोहोचले.