दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत. आम आदमी पक्षाचे संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहायक बिभव कुमार यांच्यावर त्यांनी मारहाणीचे आरोप केले आहेत. या आरोपानंतर ‘आप’ पक्ष आणि स्वाती मालिवाल यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. तसेच प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने एकतर्फी व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे त्यांना येणाऱ्या धमक्यात वाढ झाली आहे, असेही त्या म्हणाल्या.

स्वाती मालिवाल यांनी काही वेळापूर्वी एक्सवर पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “माझ्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझे चारित्र्यहनन करण्याची मोहीम उघडली. त्यानंतर आता माझ्याबद्दल अश्लील कमेंट करणे, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सुरू केला आहे. तसेच युट्यूबर ध्रुव राठीच्या एकांगी व्हिडीओनंतर या प्रकारात आणखी वाढ झाली आहे.”

स्वाती मालिवाल पुढे म्हणाल्या, ध्रुव राठीसारखा एक मुक्त पत्रकार आम आदमी पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखा वागत आहे. त्यामुळे मी पीडित असूनही मला अत्यंत खालच्या दर्जाच्या कमेंट आणि धमक्यांचा सामना करावा लागत आहे.

“मी तक्रार मागे घ्यावी, यासाठी माझा पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. त्यासाठी मला धमकावण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. तसेच ध्रुव राठीला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने माझ्या कॉल आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष केले”, असेही स्वाती मालिवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्वाती मालिवाल यांनी सांगितल्याप्रमाणे ध्रुव राठीने २२ मे रोजी एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. ध्रुव राठीला युट्यूबवर दोन कोटी लोक फॉलो करतात. तर एक्स या साईटवर त्याचे २.२ कोटी फॉलोअर्स आहेत. स्वाती मालिवाल यांच्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडले? याचा व्हिडीओ ध्रुव राठीने प्रसारीत केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ध्रुव राठीने त्याच्या व्हिडीओमध्ये स्वाती मालिवाल यांच्याबरोबर काय झाले असावे? याची चर्चा केली आहे. यासाठी त्याने सीसीटीव्ही व्हिडीओ आणि माध्यमात आलेल्या बातम्यांचा आधार घेतला आहे. तसेच भाजपाप्रणीत व्यवस्थेने स्वाती मालिवाल प्रकरणात जो वेग दाखविला तो वेग ब्रिजभूषण सिंह आणि प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणात का दाखवला नाही? असाही सवाल उपस्थित केला.