– धवल कुलकर्णी
दिल्लीमध्ये झालेल्या तबलीगी मरकजशी संबंधित वाढत असलेल्या करोनाच्या केसेस या संघटनेने जाणून-बुजून केल्याचे आरोप होत आहेत. बऱ्याचदा याचे खापर उगाचच संपूर्ण मुस्लीम समाजावरच फोडले जात आहे. मात्र करोनाचा जोरदार प्रसार होत असताना सुद्धा दिल्ली मध्ये असा कार्यक्रम घेणे ही जाणून-बुजून केलेली कृती नसून “नादानी” तूंन घडलेला प्रकार असावा असे महत्त्वाचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या नेत्याने केला आहे.
“तबलीगी मरकज चा इतिहास हा मोठा रोचक आहे मात्र त्यांच्या या नादानी मुळे पूर्ण देशाला आज शिक्षा भोगावी लागत आहे,” असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल यांनी सांगितले. संघ परिवारामध्ये खास मुसलमानांसाठी असलेली एकमेव संघटना म्हणजेच मुस्लिम राष्ट्रीय मंच. संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी व जम्मू-काश्मीरमध्ये कधीकाळी प्रचारक असलेले इंद्रेश कुमार हे या संघटनेचे अध्वर्यू आहेत.
“करोना वायरस चा प्रसार होत असताना सुद्धा असा कार्यक्रम घेणे हा कदाचित नादानी चा प्रकार असावा त्यांनी ही कृती जाणून-बुजून केली असं वाटत नाही. परंतु दुःख या गोष्टीचं होतं की ज्या वेळेला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी या मरकजला गेलेल्या या मंडळींची तपासणी करायला जातात त्या वेळेला त्यांच्यावर शारीरिक हल्ले केले जातात. हा प्रकार मात्र जाणून-बुजून केला जातो आणि त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी मोहम्मद अफजल यांनी केली.
तबलीगीच्या या नादानीची शिक्षा पूर्ण देश भोगत आहे. समजा उद्या असे लक्षात आले की हा नादानीचा प्रकार नसून एक जाणून-बुजून केलेली कृती आहे तर इस्लामनुसार हा सर्वात मोठा गुन्हा ठरेल. कारण मनुष्याची हत्या हा एक मोठा गुन्हा आहे आणि अनेक इस्लामी देशांमध्ये याची शिक्षा म्हणजे फक्त देहदंड असतो असे ते म्हणाले.