वृत्तसंस्था, तैपेई

तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (डीपीपी) उमेदवार लाई चिंग-ते यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. तैवानमध्ये शनिवारी कायदेमंडळ आणि अध्यक्षपदासाठी या दोन्ही निवडणुकांसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये ‘डीपीपी’ला सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळाला.

‘डीपीपी’च्या त्साई इंग-वेन यांनी अध्यक्षपदाच्या दोन कारकीर्द पूर्ण केल्यानंतर आता त्यांचे सहकारी लाई चिंग-ते अध्यक्ष होणार आहेत. हा पक्ष चीनविरोधात स्वायत्त आणि सार्वभौम तैवानसाठी भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि तैवानदरम्यान तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात होते.

लाई यांनी यापूर्वी तैनान शहराचे महापौर म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय संरक्षण, अर्थव्यवस्था आणि लोकशाही मित्र देशांबरोबर सहकार्य बळकट करण्याचे काम पुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच चीनला प्रतिकार कायम ठेवण्यावरही त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भर दिला होता.

हेही वाचा >>>राम मंदिराबाबत चारही शंकराचार्यांमध्ये मतभेद आहेत का? पुरीच्या शंकराचार्यांचे महत्त्वाचे विधान

आपल्या सरकारमध्ये पक्षीय कल न पाहता क्षमता पाहून लोकांचा समावेश केला जाईल, त्यामुळे आव्हानांना कार्यक्षमपणे प्रतिसाद देता येईल, हे सरकार सर्वसमावेशक असेल आणि तैवानी जनतेला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र आणेल असा विश्वास लाई यांनी व्यक्त केला आहे. मुत्सद्देगिरी, स्थैर्य, संरक्षण स्वयंपूर्णता, अर्थव्यवस्था, ऊर्जा, युवा तसेच शिक्षणाचा दर्जा यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तैवानच्या सेंट्रल इलेक्शन कमिशनने दिलेल्या माहितीप्रमाणे, लाई यांनी ५० लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. एकूण मतांमध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कुओिमतांग पक्षाचे उमेदवार हाऊ यू-इ यांना ३३ टक्के मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर तिसऱ्या क्रमांकावरील तैवान पीपल्स पार्टीचे को वेन-जे यांना २६ टक्के मते मिळाली.