नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षांची अत्यंत गुंतागुंतीची सुनावणी कौशल्याने पार पाडणारे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना जल्पकांकडून त्रास दिला जात आहे. न्यायालयीन प्रक्रियेत बाह्य घटकांचा हस्तक्षेप होत असून या जल्पकांवर तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे खासदार विवेक तन्खा यांच्यासह १३ विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेबाबत तसेच, राज्यपालांच्या भूमिकासंदर्भात अत्यंत घटनात्मक मुद्दय़ांवर महत्त्वाची सुनावणी घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांबद्दल सहानुभूती असलेल्या जल्पकांच्या टोळधाडीने सरन्यायाधीशांच्या विरोधात शाब्दिक हल्लाबोल केला आहे. आक्षेपार्ह व निंदनीय मजकूर समाजमाध्यमांवर लाखो लोकांनी पाहिला आहे, असे १६ मार्च रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

हे पत्र काँग्रेसचे खासदार विवेक तन्खा यांनी लिहिले असून दिग्विजय सिंह यांनी अनुमोदन दिले आहे. या पत्रावर काँग्रेसचे शक्तीसिंह गोहिल, प्रमोद तिवारी, एमी याज्ञिक, रंजीत रंजन, इम्रान प्रतापगढम्ी, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, शिवसेना (ठाकरे गट) सदस्य प्रियंका चतुर्वेदी आणि समाजवादी पक्षाचे खासदार जया बच्चन आणि राम गोपाल यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तन्खा यांनी याच मुद्दय़ावर अ‍ॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना स्वतंत्र पत्र लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्कालीन राज्यपालांविषयीच्या ताशेऱ्यांमुळे लक्ष्य 

महाराष्ट्रात ठाकरे सरकारला बहुमताची चाचणी घेण्याचे निर्देश तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले होते. राज्यपालांच्या भूमिकेवर सरन्यायाधीशांनी ताशेरे आढले होते. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांवर जल्पकांनी टीका केली.