तालिबान्यांनी येथील ग्रीन टाऊन परिसरात उभारलेले बेकायदा दूरध्वनी केंद्र पोलिसांनी मंगळवारी उद्ध्वस्त केले. या दूरध्वनी केंद्रातून तालिबानी अपहृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना खंडणीसाठी दूरध्वनीद्वारे धमक्या दिल्या जात होत्या. या केंद्रातून काही शस्त्रास्त्रे आणि स्फोटकेही पोलिसांनी जप्त केली.
याप्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली आहे, यास लाहोरचे पोलीस प्रमुख राय ताहीर यांनी दुजोरा दिलेला नसला तरी पाच जणांना अटक करून कोठडीमध्ये ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचा मुलगा अली हैदर गिलानी आणि पंजाबचे दिवंगत गव्हर्नर सलमान तसीर यांचा मुलगा शाहबाझ याचेही अपहरण करण्यात आल्यानंतर ‘तेहरीक-ए-तालिबान’ संघटनेकडून या नेत्यांच्या कुटुंबीयांना लाहोरच्याच बेकायदा दूरध्वनी केंद्रातून  खंडणीसाठी धमकावण्यात आले होते.