मद्रास उच्च न्यायालयाने तामिळ भाषेबाबत आपलं मत नोंदवलं आहे. तामिळ ही देवाची भाषा असल्याचं सांगत देशभरातील मंदिरात देवपूजा संतांनी रचलेल्या तामिळ भजनांद्वारे करण्यास हरकत नसल्याचं सांगितलं आहे. लोक बोलत असलेली प्रत्येक भाषा ही देवाची भाषा असल्याचंही देखील न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती एन किरूबाकरण आणि न्यायमूर्ची बी पुगालेंधी यांच्या खंडपीठानं हे मत नोंदवलं आहे. “केवळ संस्कृत ही देवाची भाषा आहे, असा विश्वास ठेवला जातो. विविध देश आणि धर्मांमध्ये भिन्न श्रद्धा आहेत. संस्कृती आणि धर्मानुसार प्रार्थनास्थळं देखील भिन्न आहेत. स्थानिक भाषेचा उपयोग त्या ठिकाणी देवाशी संबंधित कामांसाठी केला जातो. मात्र आपल्या देशात संस्कृत ही देवाची भाषा असल्याचा विश्वास आहे आणि इतर कोणतीही भाषा त्याच्या बरोबरीची नाही. संस्कृत ही प्राचीन भाषा असून त्यात अनेक साहित्य रचले गेले आहेत. तसेच संस्कृत वेदांचं पठण केल्यानंतर देव प्रार्थना ऐकतो, असा समज आहे.”, असं मत खंडपीठानं नोंदवलं आहे.

राज्याच्या कारूर जिल्ह्यातील एका मंदिरात तिरूमुराईकल, तामिळ मंत्र आणि संत अमरावती अतरांगरई करूरच्या पठणासह देवपूजा करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती याचिका करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी करताना आपलं मत नोंदवलं आहे. “भाषा अनेक शतकांपासून अस्तित्वात आहेत. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत भाषेतून ज्ञान पोहोचलं आहे. त्यामुळे विद्यमान भाषेत सुधारणा होऊ शकते आणि भाषेची कोणतीही निर्मिती होऊ शकत नाही”, असं मत खंडपीठानं सांगितलं.

“चीनला आपला सर्वात मोठा शत्रू समजणं ही…”; ९/११ हल्ल्याच्या २० व्या स्मृतीदिनी अमेरिकेला चीनचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“याचिकाकर्त्यांनी एका विशिष्ट मंदिरात तामिळ श्लोकांचं पठण करण्याची विनंती केली होती. मात्र हे केवळ एका मंदिरासाठी लागू होत नाही. तर देशभरातील मंदिरात स्तोत्रांचं पठण झालं पाहीजे”, असंही खंडपीठाने नमूद केलं. डीएमके आणि एआयएडीएमके पक्ष १९६७ पासून राज्यातील सर्व क्षेत्रात तामिळ भाषेचा वापर करण्यास आग्रही आहेत, असंही सांगण्यात आलं. जर तामिळनाडूत असलेल्या मंदिरात तामिळ स्तोत्र वापरता येत नसतील तर इतर कुठेही वापरता येणार नाही, असं मतही खंडपीठानं नोंदवलं.