Donald Trump Tariffs On India: परराष्ट्र धोरणाचे निरीक्षण करणारे डेमोक्रॅटिक पॅनेल, यूएस हाऊस फॉरेन अफेयर्स कमिटी ऑफ डेमोक्रॅट्सने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रशियाकडून तेल खरेदी करतात म्हणून भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णयाशी असहमती दर्शवली आणि म्हटले की, हे व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन युद्ध सुरू ठेवण्यापासून “रोकणार नाही”. पॅनेलच्या मते, ट्रम्प पुतिन यांना शिक्षा करण्यासाठी युक्रेनला लष्करी मदत देऊ शकतात.
“भारतावरील टॅरिफ पुतिन यांना थांबवू शकणार नाही. जर ट्रम्प यांना खरोखरच रशियाच्या युक्रेनवरील बेकायदेशीर आक्रमणाला तोंड द्यायचे असेल, तर त्यांनी पुतिन यांना शिक्षा करावी आणि युक्रेनला आवश्यक असलेली लष्करी मदत द्यावी. बाकी सर्व काही फसवणूक आणि दिखावा आहे”, असे डेमोक्रॅटिक समितीने म्हटले आहे.
भारताला टॅरिफ वाढवण्याची धमकी
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारताला रशियन तेल व्यापारावर टॅरिफ वाढवण्याचा इशारा दिल्याच्या प्रत्युत्तरात डेमोक्रॅटिक पॅनेलचे हे विधान आले. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, बेसेंट म्हणाले की, टॅरिफमधील वाढ ही ट्रम्प आणि पुतिन यांच्या अलास्कामध्ये झालेल्या उच्च-स्तरीय बैठकीच्या निकालावर अवलंबून आहे.
“रशियन तेल खरेदी करत असल्यामुळे आम्ही भारतावर सेकेंडरी टॅरिफ लादले आहे. आणि जर गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर निर्बंध किंवा हे टॅरिफ वाढू शकते हे मला दिसून येते. मला वाटते की सर्वजण राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर निराश झाले आहेत. आम्हाला अपेक्षा होती की ते अधिक परिपूर्ण मार्गाने चर्चेच्या टेबलावर येतील. असे दिसत होते की ते वाटाघाटी करण्यास तयार असतील”, असे ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात, ट्रम्प यांनी रशियन कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवल्याबद्दल ‘दंड’ म्हणून भारतीय निर्यातीवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. ब्राझील वगळता ट्रम्प यांनी त्यांच्या ताज्या यादीनुसार लावलेला हा सर्वाधिक कर आहे.
चीनबाबत भूमिका
बेसेंट यांना रशियाच्या कच्च्या तेलाचा मुख्य खरेदीदार चीनही आहे, असे विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, “राष्ट्राध्यक्षांपेक्षा पुढे जाणार नाही, परंतु राष्ट्राध्यक्ष स्वतःसाठी फायदा निर्माण करण्यात सर्वोत्तम आहेत आणि ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासमोर स्पष्ट करतील की, सर्व पर्याय टेबलावर आहेत.”