बंगाली दूरचित्रवाणीवरील मालिकेसाठी लिखाण करण्याच्या हेतूने बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. महिलांवरील अत्याचारांसदर्भात ही मालिका प्रक्षेपित करण्यात येणार असून त्याच मालिकेसाठी नसरीन लिखाण करणार आहेत.
संकटात सापडलेल्या महिला त्याविरोधात कसा उग्र लढा देतात, याचे चित्रण करणारी ‘दुसाहोबास’ ही मालिका येत्या १९ डिसेंबरपासून ‘आकाश आठ’ या वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. त्या मालिकेच्या कथांचे लेखन तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.
हुंडा, जबरदस्तीने विवाह, बालविवाह, बलात्कार, जबरदस्तीचा वेश्या व्यवसाय, आदी संकटांनी वेढलेल्या महिलांनी त्याविरोधात कसा समर्थ लढा दिला, याचे चित्रण सदर मालिकेद्वारे करण्यात येणार आहे. अन्य मालिकांमधील महिला केवळ घरकामे करणाऱ्या सोशिक पत्नी किंवा पारंपरिक पद्धतीच्या दाखविल्या जातात. या मालिकेतील महिलांमध्ये अत्यंत समर्थ अशी स्त्री बघायला मिळेल, असा दावा नसरीन यांनी केला.