Teen set on fire in Odishas Puri ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. शनिवारी एका १५ वर्षीय मुलीला काही हल्लेखोरांनी जिवंत जाळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बालासोरमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने शिक्षिकेविरुद्धच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर कारवाई न केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर ही घटना घडली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, १५ वर्षीय मुलीला गंभीर अवस्थेत एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बयाबार गावात तीन हल्लेखोरांनी मुलीला जाळून टाकले. पीडिता तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असताना तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला. महिला आणि बालविकास विभागाच्या प्रभारी उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी एका ‘एक्स’ पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली.

“पुरी जिल्ह्यातील बालंगा येथे काही हल्लेखोरांनी रस्त्यावर एका पंधरा वर्षीय मुलीवर पेट्रोल ओतून तिला जाळल्याची बातमी ऐकून मला दुःख झाले आणि धक्का बसला आहे,” असे त्यांनी लिहिले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “मुलीला तात्काळ एम्स भुवनेश्वरमध्ये हलवण्यात आले आहे आणि तिच्या उपचारांसाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहेत. उपचाराचा सर्व खर्च सरकार करेल. पोलीस प्रशासनाला दोषींना तात्काळ अटक करण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे त्यांनी सांगितले.

बालासोर आत्महत्या प्रकरण

१२ जुलै रोजी बालासोरमधील फकीर मोहन (स्वायत्त) महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थिनीने एका शिक्षकाविरुद्धच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर कारवाई न झाल्याने स्वतःला पेटवून घेतले. तिच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे विद्यार्थिनीने कॉलेजच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतले. पीडिता ९५ टक्के भाजली आणि १४ जुलै रोजी एम्स भुवनेश्वरमध्ये तिचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेबद्दल एका सहाय्यक प्राध्यापकाला अटक करण्यात आली. फकीर मोहन महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) एका शोध पथकाने शुक्रवारी बालासोरला भेट दिली. या विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ओडिशा बंद पाळला. या घटनेचा सखोल तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित विभागप्रमुखासह कॉलेजच्या प्राचार्याला अटक केली. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवले.