Tej Pratap Yadav Girlfriend: बिहारचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र, माजी उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. शनिवारी त्यांनी अनुष्का यादव नामक महिलेचा फोटो शेअर करत त्या दोघांमध्ये १२ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. मात्र काही वेळातच त्यांनी फेसबुकवरील पोस्ट डिलीट केली. तसेच एक्सवर एक वेगळी पोस्ट टाकून फेसबुक हॅक झाल्याचा दावा केला. फोटो एडिट करून कुणीतरी आपली बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काही वर्षांपूर्वी तेजप्रताप यादव यांचा पत्नी ऐश्वर्या रॉयशी घटस्फोट झाला होता. लग्नानंतर काही महिन्यातच त्यांच्यात बिनसले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच तेजप्रताप यादव यांनी प्रेमाची कबुली देणारी पोस्ट टाकल्यानंतर अल्पावधीतच पोस्ट व्हायरल झाली.
फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये तेजप्रताप म्हणाले, “मी तेजप्रताप यादव माझ्या बाजूला उभी असलेली महिला अनुष्का यादव आहे. आम्ही एकमेकांवर १२ वर्षांपासून प्रेम करत आहोत. १२ वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत.”

“मी खूप दिवसांपासून ही गोष्ट तुम्हा सर्वांना सांगणार होतो. पण कसे सांगू हे समजत नव्हते. त्यामुळेच या पोस्टच्या माध्यमातून माझ्या मनातील गोष्ट आज इथे शेअर करत आहे. आशा करतो की, तुम्ही हे समजून घ्याल”, असेही तेजप्रताप यादव पुढे म्हणाले.
तेजप्रताप यादव यांच्या पोस्टनंतर सदर पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या. काहींनी आता पोस्ट डिलीट करू नका, असे आधीच सांगितले. लग्न मोडल्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांनी प्रेमाची कबुली दिल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुकही केले. तसेच आता तुम्ही लग्न करणार का? असा प्रश्न काहींनी विचारला.
मात्र काही वेळातच तेजप्रताप यादव यांनी सदर पोस्ट डिलीट करत एक्सवर खुलासा करणारी दुसरी पोस्ट टाकली. “माझे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले असून माझे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात येत आहेत. यातून माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. मी माझ्या हितचिंतक आणि फॉलोअर्सना सांगू इच्छितो की, त्यांनी सावध राहावे आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये”, असे तेजप्रताप यादव म्हणाले.
तेजप्रताप यादव मालदिवच्या सुट्टीवर
तेजप्रताप यादव सध्या मालदिवमध्ये असून तेथील पर्यटनाचा आनंद घेत आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर समुद्रकिनारी ध्यान करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हाही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
तेजप्रताप यादव यांचे लग्न बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्या रॉय यांच्याशी झाले होते. मात्र काही महिन्यातच लग्न मोडले. ऐश्वर्या रॉय यांनी तेजप्रताप यादव आणि सासरच्या मंडळीवर आरोप करत त्या घरातून बाहेर पडल्या. यानंतर ऐश्वर्या राय यांचे वडील, माजी मंत्री चंद्रिका रॉय यांनीही आरजेडी पक्षाचा राजीनामा देत यादव परिवाराशी राजकीय आणि कायदेशीर लढाई सुरू केली.
सध्या दोघांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.