Tejashwi Yadav on Tej Pratap Yadav Expels from RJD : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी त्यांचे थोरले पुत्र तथा माजी मंत्री तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. लालू यादव यांनी तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. तसेच त्यांना कुटुंबातूनही बेदखल केल्याचं लालू यादव यांनी सांगितलं. लालू यादव यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या निर्णयामागची सविस्तर माहिती दिली आहे. बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्ये तसेच सार्वजनिक जीवनातील शिष्टाचारापासून विचलित झाल्यामुळे सदर निर्णय घेतल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

तेज प्रताप यादव यांनी शनिवारी (२४ मे) फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी अनुष्का यादव नावाच्या महिलेशी त्यांचे प्रेमसंबंध असून १२ वर्षांपासून ते दोघे एकत्र असल्याची माहिती दिली होती. ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करत आहोत, असंही त्यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर काही तासांनी त्यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली.

तेज प्रताप यादव यांच्या हकालपट्टीबाबत तेजस्वी यादव काय म्हणाले?

दरम्यान, आपल्या मोठ्या भावावर वडिलांनी केलेल्या कारवाईवर लालू यादव यांचे धाकटे पुत्र व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्हाला हे सगळं योग्य वाटत नाही. हे सहन होण्यापलीकडचं आहे. हे प्रकरण माझ्या मोठ्या भावाशी संबंधित आहे. मात्र, ते प्रौढ आहेत, खासगी आयुष्यात काय निर्णय घ्यायला हवेत, काय नको ते ठरवण्याइतके मोठे ते नक्कीच आहेत. त्यांना त्याचा अधिकारही आहे. मात्र, आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घेतला आहे तो आता सार्वजनिक झाला आहे. बाकी मी त्यावर फार काही बोलू शकत नाही. माझे मोठे भाऊ त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात, त्याची कोणाला माहिती नसते. घरातली मंडळी देखील त्यांना प्रश्न विचारत नाही. मला देखील तुम्हा प्रसारमाध्यमांमुळे माहिती मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लालू प्रसाद यादव यांची कठोर कारवाई

थोरल्या मुलावर कारवाई करताना लालू प्रसाद यादव म्हणाले, “वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक न्यायासाठी आपण करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. मोठा मुलगा ज्या प्रकारची कृत्ये करतो, लोकांशी त्याचे वागणे आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्यांच्या, संस्काराच्या विरोधात आहे. त्याच्या कृत्यांमुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून बेदखल करत आहे. आता पक्ष आणि कुटुंबात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्याला पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकण्यात येत आहे”.