Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दोन टप्प्यांत येथील निवडणुका होणार आहेत. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नितीश कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर, चिराग पासवान, राहुल गांधी यांच्यासह आदी नेते निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घोषणा करत आहेत. आता आरजेडीचे नेते तथा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचं सरकार आल्यानंतर पहिल्या २० दिवसांत प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याच्या संदर्भातील कायदा करणार असल्याची घोषणा तेजस्वी यादव यांनी केली आहे. याच बरोबर बिहारचा विकास करण्यासाठी आणखी काही घोषणा देखील तेजस्वी यादव यांनी केल्या आहेत. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

तेजस्वी यादव यांनी काय म्हटलं?

आज तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी म्हटलं की, “बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही माझी पहिलीच मोठी घोषणा आहे. बिहारमधील ज्या कुटुंबात सरकारी नोकरी नाही, अशा प्रत्येक कुटुंबात एक सरकारी नोकरी दिली जाईल अशा प्रकारचा कायदा आम्ही करणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी गेल्या २० वर्षांत कोणत्याही सरकारी नोकऱ्या दिलेल्या नाहीत. मात्र, या निवडणुकीनंतर आमचं (आरजेडी) सरकार बनल्यानंतर २० दिवसांत याबाबतचा नियम बनवण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत”, असं आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिलं आहे.

“तसेच आमच्या सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर पुढच्या २० महिन्यांत बिहारमध्ये एकही असं घर नसेल की त्या घरी एकही सरकारी नोकरी नसेल. याचा अर्थ आमचं सरकार बनल्यानंतर पहिल्या २० दिवसांत ज्या कुटुंबात सरकारी नोकरी नाही, त्या प्रत्येक घरात आमचं सरकार एक सरकारी नोकरी देईल”, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.