प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू

केंद्रात सत्तास्थापनेत भाजप किंवा काँग्रेस या दोन मुख्य पक्षांकडे सरकार स्थापण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्यास प्रादेशिक पक्षांच्या गटाचे नेते म्हणून आपले घोडे पुढे दामटविण्याच्या उद्देशानेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांची भेट घेतल्यावर पुढील आठवडय़ात चेन्नईत द्रमुक नेते स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तीनचतुर्थाश बहुमत मिळाल्यावर चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय राजकारणात जाण्याचे वेध लागले. काँग्रेस आणि भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे. प्रादेशिक पक्षांचा महासंघ स्थापन करून त्याचे नेतृत्व करण्याचा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून चंद्रशेखर राव यांचे भारतभ्रमण सुरू झाले आहे. सोमवारी थिरुअनंतपूरम येथे केरळचे मुख्यमंत्री विजयन यांची त्यांनी भेट घेतली. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय स्तरावर भूमिका घेईल. तरीही विजयन यांची भेट घेऊन राव यांनी सहकार्याचा प्रस्ताव समोर ठेवला. उभयतांनी परस्परांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रशेखर राव यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते. तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने तसे पत्रक प्रसिद्ध केले आहे.  चंद्रशेखर राव हे पुढील सोमवारी चेन्नईत द्रमुक नेते स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. वास्तविक द्रमुक पक्षाची काँग्रेसबरोबर आघाडी आहे. तसेच राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत, अशी जाहीरपणे भूमिका स्टॅलिन यांनी मांडली होती. तमिळनाडूत द्रमुक-काँग्रेस आघाडीला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा केली जाते. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांनी स्टॅलिन यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला आहे. तशीच वेळ उद्भवल्यास स्टॅलिन यांनी सहकार्य करावे, अशी चंद्रशेखर राव यांची अपेक्षा आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. राव हे चेन्नईनंतर बंगळूरुची वारी करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी चंद्रशेखर राव यांनी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याच्या उद्देशानेच कोलकात्यात जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. ममता बॅनर्जी यांचीही दिल्लीच्या राजकारणात महत्त्वाची कामगिरी करण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. कोलकाता भेटीनंतर चंद्रशेखर राव यांनी भुवनेश्वरमध्ये ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. नंतर बंगळूरुमध्ये जाऊन माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याशी चर्चा केली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देशम नेते एन. चंद्राबाबू नायडू यांना राष्ट्रीय राजकारणात १९९९ ते २००४ या काळात महत्त्व मिळाले होते. याच धर्तीवर राष्ट्रीय राजकारणात भूमिका बजाविण्याची चंद्रशेखर राव यांची योजना आहे.

केंद्रात भूमिका बजाविणार ?

भाजपला २७२चा जादूई आकडा गाठता आला नाही तर मित्रपक्षांची गरज भासेल. अशा वेळी प्रादेशिक पक्षांची मोट बांधून त्याचे नेतृत्व करण्याची चंद्रशेखर राव यांची योजना आहे. तेलंगणाचे नेतृत्व मुलाकडे सोपावून केंद्रात महत्त्वाचे खाते भूषविण्याचे राव यांना वेध लागले आहे. तेलंगणातील १७ पैकी सर्व जागा जिंकण्याचा राव यांचा प्रयत्न आहे. खासदारांचे संख्याबळ असल्यास दिल्लीच्या राजकारणात महत्त्व वाढेल हे लक्षात घेऊन चंद्रशेखर राव यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.

चंद्रशेखर राव यांच्याबरोबर झालेली बैठक महत्त्वपूर्ण होती. लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची राहील.

– पिनराई विजयन, केरळचे मुख्यमंत्री