Radhika Yadav friend Himaanshika Video: हरियाणाची राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येनंतर आता या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राधिकाची जवळची मैत्रिण हिमांशिका राजपूतने तिच्या इन्स्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर करत आरोपी दीपक यादव यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. खून होण्याआधीचे १० दिवस राधिका खूप तणावात होती. तसेच वडील जे सांगतिल ते मी करण्यासाठी तयार आहे, अशी भूमिका तिने कुटुंबियांसमोर व्यक्त केली असल्याची माहिती हिमांशिकाने दिली.
तीन दिवस आधीच आखली हत्येची योजना
१० जुलै रोजी राधिका यादवला तिच्याच वडिलांनी मागून गोळ्या झाडल्या होत्या. हिमांशिकाने सांगितले की, त्यांनी तीन दिवस आधीपासून या हत्येची योजना आखली. यासाठी त्यांनी पिस्तूल विकत घेतली. हत्या करण्याच्या दिवशी त्यांनी आईला वेगळ्या खोलीत पाठवले होते. भावाला काही कामानिमित्त बाहेर पाठवले. तसेच राधिकाचा आवडता श्वान मध्ये येऊ नये म्हणून त्यालाही दुसरीकडे ठेवले होते. त्यानंतर त्यांनी मागून तिला गोळ्या घातल्या.
हिमांशिका पुढे म्हणाली, “कोणता बाप आपल्या मुलीवर पाच गोळ्या झाडतो. एवढे तिने काय केले होते? राधिकाचे वडील त्यांच्या मित्रांच्या प्रभावाखाली आले होते. कारण राधिका दिवसेंदिवस प्रगती करत होती. ज्यांची टोमणे ऐकूण राधिकाच्या वडिलांनी तिचा खून केला, ते टोमणेही फार तकलादू होते.”
“तुमची मुलगी मेकअप करायला लागली, ती तोकडे कपडे घालते, आता तू हिच्या पैशांवर जगणार का? तू तिला देहविक्रीलाच पाठव”, असे टोमणे दीपक यादव यांचे मित्र मारत असल्याचे हिमांशिकाने आपल्या व्हिडीओत म्हटले.
पुरूषांच्या स्वार्थासाठी कधीपर्यंत मुली मरत राहणार? असा संतप्त सवालही हिमांशिकाने उपस्थित केला आहे. तसेच राधिका यादव सोशल मीडियाच्या आहारी गेली होती, हा आरोपही तिने खोडून काढला. तिने म्हटले की, राधिकाचे अकाऊंट प्रायव्हेट होते. तसेच तिचे फक्त ६८ फॉलोअर्स होते. ती फक्त तिच्या मित्रांच्या संपर्कात होती. तसेच तिने शेवटचे रिल मार्च २०२५ ला अपलोड केले होते.
राधिका खूप चांगली आणि सभ्य मुलगी होती. पण मागच्या १० दिवसांपासून ती खूप भोगत होती. मात्र तिच्या वडिलांमुळे राधिकाला आपला जीव गमवावा लागला आहे, अशी खंत हिमांशिकाने व्यक्त केली.