Terror Plot Foiled Near India-Pakistan Border: सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पंजाब पोलिसांच्या समन्वयाने अमृतसर जिल्ह्यातील भरोपाल गावाजवळ दहशतवादी कट उधळून लावला असून, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा जप्त केला आहे. बीएसएफ इंटेलिजेंस विंगने दिलेल्या माहितीच्या आधारे, बुधवारी संध्याकाळी संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांना दोन हातबॉम्ब, तीन पिस्तूल, सहा मॅगझिन आणि ५० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. जप्त केलेली शस्त्रे आणि स्फोटके पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर वाढलेल्या सुरक्षा चिंतांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. या हल्ल्यानंतर शस्त्रास्त्रांची तस्करी आणि भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यांविरोधात सैन्य सतर्क आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली होती. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी, मंगळवारी अमृतसरच्या काठियानवाला बाजारात दोन अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी गँगस्टर रवनीत सिंग उर्फ ​​सोने मोटे याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. “दोन जणांनी रवनीत सिंग नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. आम्ही घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आहे आणि गुन्हेगारांना लवकरच पकडले जाईल. गँगस्टर रवनीत सिंग उर्फ ​​सोने मोटे याला रुग्णालयात नेण्यात आले आहे,” असे अमृतसरचे एडीसीपी विशालजीत सिंग यांनी एएनआयला सांगितले होते.

सोमवारी, विशेष कार्य दलाने (एसटीएफ) झज्जर पोलिसांच्या सहकार्याने कुख्यात गुंड कुणाल जूनला अटक केली होती. जो अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये फरार होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, बहादूरगड येथील रहिवासी कुणाल जूनवर एकूण १५ गुन्हे दाखल आहेत.

कर्नाल रेंजचे पोलिस अधीक्षक वसीम अक्रम म्हणाले, “कुणाल जून हा मूळचा बहादूरगडच्या नुना माजरा गावचा रहिवासी आहे. तो अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी आहे. रोहतक आणि झज्जर जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी त्याच्याविरुद्ध सुमारे १५ गुन्हे दाखल आहेत.”

वसीम आक्रम यांनी पुढे सांगितले की, “आरोपी कुणाल जून हा बनावट पासपोर्ट वापरून भारतातून पळून गेला होता आणि अटक टाळून परदेशातून गुन्हेगारी कारवाया करायचा. जून अनेक प्रकरणांमध्ये फरार होता. त्याला एका प्रकरणात अटकही झाली होती. पण, जेव्हा त्याला जामीन मिळाला तेव्हा तो बनावट पासपोर्टसह परदेशात पळून गेला होता.” याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.