प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतात दौऱयावर असल्यामुळे दहशतवादी यावेळी शाळा, लष्करी गाड्या आणि शहरातील गजबजलेली ठिकाणांवर हल्ले करून आपलं अस्तित्त्व दाखवून देण्याची शक्यता असल्याचे लष्कराचे लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून बराक ओबामा पत्नी मिशेलसह या महिन्यात भारत दौऱयावर येत आहेत. २५ ते २७ जानेवारी या काळात ओबामा भारतात वास्तव्याला असणार आहेत. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱया संचलनामध्ये ओबामा विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तविली. त्यातही जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवाद्यांच्या कोणत्याही कृतीला उत्तर द्यायला भारतीय लष्कर संपूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि दहशतवादी हे भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी परस्परांशी समन्वय राखून आहेत. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी तेहरिक ए तालिबान लष्करे तैय्यबाला मदत करण्याची शक्यताही नाकारता येणार नाही, असेही सिंग म्हणाले.

Story img Loader