Tamil Nadu Vijay rally Stampede : तमिळ अभिनेता थलपती विजय तामिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. थलपती विजय सध्या तामिळनाडूमध्ये रॅली काढत जाहीर सभा घेत आहे. मात्र, २७ सप्टेंबर रोजी करूर जिल्ह्यातील रॅलीत चेंगराचेंगरीची घटना घडली. रॅलीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ३८ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता.

या प्रकरणात ‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षाच्या एका नेत्याला अटक करण्यात आली. या घटनेत गुन्हा देखील दाखल झाला असून पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. मात्र, या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणात थलपती विजयला अटक होईल का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत आता तामिळनाडूचे मंत्री दुराई मुरुगन यांनी शनिवारी मोठं भाष्य केलं आहे. ‘जर पुरावे असतील तर सरकार आपलं कर्तव्य पार पाडेल’, असं त्यांनी म्हटलं आहे.

मंत्री दुराई मुरुगन काय म्हणाले?

“टीव्हीके प्रमुख थलपती विजयला अनावश्यकपणे अटक करणार नाही. पण जर पुरावे असतील तर सरकार त्यांचं कर्तव्य पार पाडेल. पण साधारणपणे प्रत्येक पक्षाला माहित असतं की ते आयोजित करत असलेल्या सभा किंवा बैठकांना किती लोक उपस्थित राहतील. त्यामुळे सर्वच पक्षांनी त्यांच्या अपेक्षित गर्दीसाठी योग्य ठिकाणे निवडावीत”, असं मंत्री दुराई मुरुगन यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

‘सरकार जबाबदार नाही’ : मंत्री

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सरकारवर झालेल्या टीकेबाबत बोलताना मंत्री दुराई मुरुगन यांनी म्हटलं की, “आपण या घटनेला जबाबदार कसं असू शकतो? आम्ही पोलीस संरक्षण दिलं, परवानगी दिली, अटी घातल्या आणि सल्ला दिला, म्हणून जे आमच्यावर आरोप करतात ते फक्त गॅलरीमध्ये खेळणारे राजकारणी आहेत.”

चेंगराचेंगरीची घटना नेमकं कशी घडली?

चेंगराचेंगरी का झाली त्याची विविध कारणं समोर आले आहेत. पोलीस या सगळ्या प्रकाराची चौकशी करत आहेत. सध्या विशिष्ट एका कारणामुळे चेंगराचेंगरी झाली याच्या निष्कर्षापर्यंत पोहचणं कठीण होईल असं पोलिसांनी म्हटलं. दरम्यान लोक एकदम जोशात होते, विजयचं म्हणणं ऐकण्यासाठी गर्दीचे कान एकवटले होते. अचानक काहीतरी घडलं आणि जोशात सुरु असलेली रॅली अचानक चेंगराचेंगरी सुरु झाली. त्यानंतर जोशाचं रुपांतर वेदना, किंकाळ्यांमध्ये झालं. गर्दीला नियंत्रित करण्यात पोलीस अयशस्वी ठरले त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला आणि चेंगराचेंगरीची घटना घडली.