TVK Thalapathy Vijay Rally Stampede : दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयची तामिळनाडूमधील करूर या ठिकाणी शनिवारी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या रॅली दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास १०० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर केली आहे.

त्यानंतर आता थलपती विजयनेही मोठी घोषणा करत चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख देणार असल्याचं सांगितलं आहे. थलपती विजयने या घटनेबाबत बोलताना दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या ३८ जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख रुपयांची भरपाई आणि जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये देणार असल्याचं थलपती विजयने सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

थलपती विजयने घटनेबाबत काय म्हटलं?

“जी घटना घडली त्या घटनेमुळे मला अतीव वेदना झाल्या आहेत. माझ्या मनाला वेदना होत आहेत. मी माझ्या वेदना आणि शोक शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. करुरमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्या भावांना आणि बहिणींना मी आदरांजली वाहतो. मी त्यांच्या कुटुंबांबाबत सहानुभूती व्यक्त करतो.” असं म्हणत थलपती विजयने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या एक्स पोस्टवर पोस्ट लिहून थलपती विजयने ही प्रतिक्रिया दिली. विजयने जखमींना लवकर बरं वाटावं आणि आराम पडावा म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत असल्याचंही म्हटलं आहे. लवकरात लवकर सगळ्या जखमींना बरं वाटेल अशी आशा आहे असंही त्याने म्हटलं आहे.

तामिळनाडू सरकारची मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तमिळनाडू सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय तपास आयोग नेमला आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश जस्टिस अरुणा जगदीसन या आयोगाच्या अध्यक्ष असतील.

डीजीपींनी काय सांगितलं?

“विजयला या रॅलीला पोहोचण्यास तब्बल सात तास उशीर झाला आणि त्यामुळे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच आयोजकांनी अपेक्षित लोकांची संख्या १०,००० असल्याचं सांगितलं होतं. मात्र, २७,००० लोकांनी या रॅलीत सहभाग घेतला. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. या रॅलीसाठी ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. थलपती विजयच्या आधीच्या रॅलींमध्ये गर्दी कमी होती. पण यावेळी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त गर्दी होती”, असं पोलीस अधिकारी जी वेंकटरमण यांनी म्हटलं.

“टीव्हीके पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर अभिनेता थलपती विजय दुपारी १२ वाजेपर्यंत रॅलीच्या ठिकाणी पोहोचतील अशी घोषणा केल्यानंतर गर्दी वाढली. मात्र, रॅलीसाठी परवानगी दुपारी ३ ते रात्री १० दरम्यान मागितली गेली होती. या रॅलीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून गर्दी जमा झाली होती. मात्र, या रॅलीच्या ठिकाणी थलपती विजय सायंकाळी ७.४० वाजता दाखल झाला. कडक उन्हात लोकांकडे पुरेसं अन्न आणि पाणी नव्हतं. आता चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली? याचं नेमकं कारण आता सांगणं कठीण असून पोलीस चौकशी करत आहेत”, असं वेंकटरमण यांनी म्हटलं आहे.