काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सगळ्या विरोधकांची बैठक बोलावली होती. दीर्घ काळानंतर या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदारही आले होते. तृणमूल काँग्रेसचं हे पाऊल सगळ्यांनाच चकित करणारं ठरलं. राहुल गांधी यांची खासदारी रद्द झाल्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार का मानले त्याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हटलं आहे शत्रुघ्न सिन्हा यांनी?

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे आज सगळे विरोधी पक्ष एक झाले आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो कारण भ्रष्टाचाराचा मुद्दा, सरकारी संस्थांचा गैरवापर या सगळ्याविरोधात आम्ही सगळे विरोधक एकत्र आलो आहोत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा शुभसंकेतच मानला पाहिजे असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. NDTV शी बातचीत करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आणखी काय म्हणाले आहेत शत्रुघ्न सिन्हा?

संसदेचं कामकाज चालूच दिलं जात नाही. सत्ताधारी पक्षातले मित्र काही ना काही हंगामा करतात. अशावेळी विरोधी पक्षातले खासदार आता रस्त्यावर उतरून आपला लढा देत आहेत. २०२४ च्या निवडणुका होण्याआधी एक विशिष्ट विचारधारेच्या आधारावर सगळे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. भाजपाचा कठीण काळ सुरू झालाच होता. त्यामुळे ते १०० गोष्टींची उत्तर देत नाहीत. सरकारी यंत्रणा, सरकारी साधनसामुग्री, सरकारी तपास यंत्रणा या सगळ्याचा गैरवापर चालला आहे. फक्त विरोधी पक्षातले लोकच यांना दोषी दिसतात. सत्ताधारी पक्षातल्या एकावरही कुठल्याच प्रकारची एकही केस दाखल झालेली नाही असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षांना ज्या प्रकारे टार्गेट केलं जातं आहे त्या प्रकाराने आता कळस गाठला आहे. सामान्य माणसांनाही या सगळ्या गोष्टी समजू लागल्या आहेत. भाजपाकडे अशी वॉशिंग मशीन आहे की त्या पक्षात गेल्यावर माणूस एकदम दुधाने अंघोळ केल्यासारखाच स्वच्छ होतो. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली त्या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. मात्र सगळे विरोधक एकवटले आहेत. याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकांवर झाल्याशिवाय राहणार नाही असंही सिन्हा यांनी म्हटलं आहे.