Raja Raghuvanshi Murder Case : मागील काही दिवसांपासून राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा सुरु आहे. मध्य प्रदेशातील इंदोरमधील सोनम आणि तिचा पती राजा रघुवंशी हे २२ मे रोजी शिलाँगमधून अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला होता. पण सोनम रघुवंशी ही बेपत्ता झाली होती. त्यानंतर ९ जून रोजी गाझिपूरमध्ये सोनम एका ढाब्यावर आढळून आली होती. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केलं, तसेच आणखी चार जणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
राजा रघुवंशीची हत्या प्रकरणात सोनमचा सहभाग असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तसेच या प्रकरणात २१ वर्षीय राज कुशवाह हा तरुण या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. राजा रघुवंशीच्या मारेकऱ्यांनी दुसऱ्या एका महिलेचा मृतदेह जाळण्याचा कट रचला होता आणि तो मृतदेह सोनमचा असल्याचा भासवण्याचा प्लॅन आरोपींचा होता अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी एक धक्कादायक बाब आढळून आली आहे की, या घटनेतील आरोपींनी एका अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळून टाकण्याची योजना आखली होती. जेणेकरून ती राजाची पत्नी सोनम रघुवंशी असल्याचं भासवता येईल. याच्या मागचा कट हा सोनमला जास्त दिवस लपून राहता यावं हा होता असं पोलिसांनी सांगितलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
वृत्तानुसार, खासी हिल्सचे (पूर्व) पोलीस अधीक्षक विवेक सय्यम यांनी सांगितलं की,”राज कुशवाह हा या हत्येच्या प्रकरणातील कटाचा सूत्रधार होता आणि सोनम रघुवंशी हिचा देखील या प्रकरणात सहभाग होता. राजा रघुवंशीला संपवण्याचा संपूर्ण कट त्यांच्या लग्नाच्या काही काळापूर्वी इंदूरमध्ये रचण्यात आला होता. आरोपीने सांगितलं की राजाची हत्या होण्यापूर्वी हत्येशी संबंधित आणखी तीन योजना आखल्या होत्या. पण या तीनही योजना प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत.”
पोलीस अधीक्षक विवेक सय्यम यांनी सांगितलं की, “राज खुशवाहासह अटक केलेले चारही मारेकरी हे सोनम आणि राज यांचे मित्र आहेत. त्यापैकी एक राजचा चुलत भाऊ आहे. लग्नाच्या तीन महिने आधी फेब्रुवारीमध्ये हत्येची योजना सुरू झाली होती. दरम्यान, दुसऱ्या एका अज्ञात महिलेची हत्या करून ती सोनम असल्याचं भासवण्याचा कट रचण्यात आला होता. तसेच आरोपींची आणखी एक अशी योजना होती की लोकांना असं वाटावं की सोनम नदीत वाहून गेली, तर दुसरी योजना म्हणजे कोणत्याही महिलेची हत्या करणे, त्या व्यक्तीचा मृतदेह सोनमच्या स्कूटर जवळ ठेवणे आणि तो मृतदेह सोनमचा आहे असं भासवणे.”