केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला सर्वच ठिकाणाहून मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे. अनेक ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी रस्ता रोको देखील केला आहे. प्रामुख्याने दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले आहेत. दिल्ली गुडगाव सीमेवर वाहनांचा मोठा खोळंबा झालाय. शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, हरियाणामध्ये देखील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून, अनेक मार्ग अडवण्यात आले आहेत. असे जरी असले तरी हरियाणामधील उचाना कलां येथे एक लक्ष वेधणारी व शेतकऱ्यांचा समजुतदारपणा दर्शवणारी घटना देखील समोर आली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टर उभा करून रोखलेल्या मार्गावर एक रुग्णवाहिका आली होती. तेव्हा त्या ठिकाणी मोठ्यासंख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी रूग्वाहिकेला वाट मोकळी करून देण्यासाठी, तत्काळ ट्रॅक्टरला धक्का मारून ते ट्रॅक्टर मार्गामधून हटवले. यानंतर रुग्णवाहिका मार्गस्थ झाली.

Bharat Band : दिल्लीच्या सीमेवर वाहतूक कोंडी, शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा

दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. येणारं जाणारं प्रत्येक वाहन सुरक्षा दलाकडून तपासलं जात आहे.

ट्रॅफिकमध्ये अडकलेल्यांकडून सोशल मीडियावर संतापही व्यक्त केला जातोय. याला आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, “नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भारत बंद होणार आहे याची माहिती आधीच देण्यात आली होती. या भारत बंदच्या काळात सकाळी ६ ते सांयकाळी ४ या वेळेत वाहतूक खोळंबा होऊ शकतो याबाबत आम्ही आधीच सतर्क केलं होतं. ज्यांनी या माहितीकडे दुर्लक्ष केलं त्यांना या अडचणीला सामोरं जावं लागत आहे.”