मुंबई : सणासुदीच्या काळात राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीत चांगलीच वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये सुमारे २८०० कोटींहून अधिक कर संकलन झाले. ही प्रणाली लागू झाल्यापासून चार वर्षांत दुसऱ्यांदा एवढे संकलन झाले आहे. 

ऑक्टोबरमध्ये राज्यात १९,३५५ कोटी जीएसटी संकलन झाले. सप्टेंबरमध्ये १६,५८४ कोटी संकलन झाले होते. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये सुमारे २,८०० कोटींनी संकलनात वाढ झाली. ही वाढ ९.२८ टक्के आहे. दहा टक्क्यांच्या आसपास वसुली वाढणे हे सणासुदीच्या काळात राज्यातील अर्थचक्र  गतिमान होत असल्याचे चिन्ह आहे, असे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जीएसटी लागू झाल्यापासून राज्यात यंदाच्या एप्रिलमध्ये सर्वाधिक २२ हजार कोटींची वसुली झाली होती. ही प्रणाली लागू झाल्यापासून राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक वसुली होती. यानंतर ऑक्टोबरमध्ये १९,३५५ कोटींची वसुली झाली.