Suspend Mail and Parcels From Pakistan : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या नंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांची चहूबाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आधी सिंधु जल करार स्थगित करून पाणीकोंडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता अर्थव्यवस्थेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, तेथील कुरिअर सेवेवरही पाबंदी आणली आहे. आज भारत सरकारने पाकिस्तानविरोधात अनेकविध निर्णय घेतले.

पाकिस्तानातून भारतात आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर भारताने बंदी आणली आहे. वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. “पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मग ती मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो किंवा नसो, पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित असेल. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल”, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

टपाल आणि पार्सल सेवा बंद

तर, भारत सरकारने पाकिस्तानमधून हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची देवाणघेवाण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं भारत सरकारने स्पष्ट केलं आहे. यामुळे पाकिस्तानातून होणारं दळणवळण थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून संपर्कच तोडण्यात आला आहे.

पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशावर बंदी

भारताने शनिवारी भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशावर बंदी घातली आणि भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरांना भेट देण्यासही बंदी घातली, असे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जहाजबांधणी महासंचालनालयाने (DGS) जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. “भारतीय मालमत्ता, मालवाहू आणि जोडलेल्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता, सार्वजनिक हितासाठी आणि भारतीय जहाजबांधणीच्या हितासाठी” सुनिश्चित करण्यासाठी “तात्काळ प्रभावाने” आणि “पुढील आदेशापर्यंत” हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत, असे DGS च्या आदेशात म्हटले आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाघा-अटारी सीमा देखील बंद करण्यात आलेली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देखील भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपलं हवाई क्षेत्र बंद केलेलं आहे. यानंतर आता पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर भारताने बंदी घातली आहे. त्यामुळे या सर्व निर्णयाचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचं बोललं जात आहे.