नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, बुधवारी, लोकसभेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये स्पष्टीकरण देण्याची मागणी सुळे यांनी केली.
शून्य प्रहरात दोन्ही खासदारांनी बेळगाव भागांतील हिंसक घटना व तणावपूर्ण परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सभागृहात तसेच, संसदेच्या आवारात महाविकास आघाडीच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. संसदेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, अमोल कोल्हे तसेच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे, अरविंद सावंत यांनी निदर्शने केली.
शून्य प्रहारात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणार असल्याची पूर्वसूचना सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाला दिली होती; पण मंगळवारी बेळगाव परिसरात झालेल्या हिंसक घटनेनंतर सुळे यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सीमावादाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राविरोधात बेताल विधाने करत आहेत. सीमाभागांमध्ये जात असलेल्या महाराष्ट्रातील लोकांना मारहाण करण्यात आली; पण या घटनेची कर्नाटक सरकारने दखल घेतलेली नाही. दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून कर्नाटक सरकार महाराष्ट्राविरोधात कट-कारस्थान करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सर्वपक्षीय बैठक घ्या- थोरात
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प कसे, असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. सीमा प्रश्नावर महाराष्ट्राची नेमकी काय भूमिका आहे, पुढचे धोरण काय असणार आहे, यावर चर्चा करण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली.
सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या भूमिकेत बदल नाही – बोम्मई
मुंबई : सीमाप्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर आपली चर्चा झाली आहे. पण सीमाप्रश्नाच्या संदर्भात कर्नाटकच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले. सीमा भागात शांतता कायम राखली गेली पाहिजे ही दोन्ही राज्यांची भूमिका आहे. त्यावर कर्नाटक सरकारही ठाम आहे. सीमा भागात दोन्ही राज्यांमधील नागरिकांमध्ये चांगले संबंध कायम असून ते यापुढेही कायम राहावेत. आम्ही आमची न्याय कायदेशीर बाजू न्यायालयात मांडू, असेही बोम्मई यांनी म्हटले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राविरोधात बेताल विधाने करत आहेत. सीमाभागांमध्ये जात असलेल्या महाराष्ट्रातील लोकांना मारहाण करण्यात आली; पण या घटनेची कर्नाटक सरकारने दखल घेतलेली नाही.
– सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
सीमाभाग केंद्रशासित करण्याची संजय राऊत यांची मागणी
मुंबई : दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावमध्ये हल्ला होऊ शकत नाही, असा आरोप करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगावसह सीमाभाग तातडीने केंद्रशासित करण्याची मागणी बुधवारी केली. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झाला असून बेळगावातील हल्ले हा त्याच कटाचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला. ज्या सरकारला राज्याच्या सीमा राखता येत नाहीत, त्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. मग महाराष्ट्र सरकार आहे की नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शहा यांना सीमाप्रश्नी भेटणार आहेत. त्यांना भेटून काय उपयोग? सीमाभागात काय सुरू आहे, हे त्यांना समजत नाही का, असे सवाल करीत महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत, म्हणूनच शिवसेनेचं सरकार घालविल्याचा आरोप राऊत यांनी केला.