चिनी सोशल मीडिया अॅप टिकटॉक (Tiktok) आणि हेलो (Helo) यांच्या वापरावर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. कारण, या अॅपच्या माध्यमातून देशविरोधी कृत्ये केली जात असल्याची तक्रार आल्याने केंद्र सरकारने या अॅपच्या अधिकाऱ्यांना २४ प्रश्नांची नोटीस पाठवली आहे. जर या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर या अॅप्सच्या वापरावर भारतात बंदी येऊ शकते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘स्वदेशी जागरण मंच’ या संघटनेने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे Tiktok आणि Helo या चीनी मोबाईल अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. ही अॅप्स देशविरोधी कामांचा अड्डा बनल्याचा आरोप या संघटनेने केला होता. या तक्रारीची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून या अॅप्सच्या अधिकाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. यावर Tiktok चे म्हणणे आहे की, पुढील तीन वर्षात स्थानिक पातळीवर जबाबदारीसाठी तंत्रज्ञानासंबंधी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कंपनी १०० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

Helo अॅपबाबत ‘स्वदेशी जागरण मंच’ने निवडणूक आयोगालाही पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, Helo अॅपद्वारे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ११ हजारांहून अधिक राजकीय जाहिरातींसाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या जाहिरातींमध्ये भारतातील वरिष्ठ नेत्यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या निवडणुकीच्यावेळी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्याचबरोबर, हे दोन्ही अॅप चीनी कंपनीचे असल्याने यामध्ये चीन सरकार हस्तक्षेपाद्वारे भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत येऊन पोहोचले आहे. याचा उपयोग भारतात सामाजीक अराजकता माजवण्यासाठी होऊ शकतो, असेही ‘स्वदेशी जागरण मंच’ने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

यापूर्वी मद्रास हायकोर्टाने Tiktok अॅपच्या डाऊनलोडिंगवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. तसेच या अॅपमधील व्हिडिओ फेसबूकवर शेअर करण्यावरही बंदी घालण्यास सांगितले होते. त्याचबरोबर लहान मुलांना या अॅप्सपासून दूर ठेवण्यासाठी काही कायदा करता येईल का? याचीही विचारणा केली होती.