२८ जण ठार, ३०० जखमी आठ अतिरेकी ठार, काही फरारी? ‘आयसिस’ जबाबदारी स्वीकारली दिल्ली, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅरिसमधील रेस्तराँ, नाटय़गृह आणि क्रीडांगणासह सात ठिकाणी ‘आयसिस’च्या अतिरेक्यांनी शुक्रवारी रात्री भीषण आत्मघातकी हल्ले चढवत केलेल्या गोळीबार आणि बॉम्बहल्ल्यांत १२८ जण मृत्युमुखी पडले असून सुमारे ३०० नागरिक जखमी झाले आहेत. हा हल्ला म्हणजे फ्रान्सविरुद्धचे युद्धच असून कोणतीही दयामाया न दाखवता चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा फ्रान्सने केली आहे. तर सिरियातील हल्ल्यांत सहभागी असलेल्या फ्रान्समध्ये यापुढेही रक्तपात सुरूच राहील, असा इशारा ‘आयसिस’ने दिला आहे. या हल्ल्यांनंतर युरोपीय देशांसह अन्य देशांतील सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे.
फ्रान्समध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सच्या भूमीवर झालेला हा सर्वात भीषण हल्ला असून २००४ साली स्पेनमधील माद्रिद येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा युरोपमधील सर्वात मोठा हल्ला आहे. जानेवारी महिन्यात पॅरिसमधील शार्ली एब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या आठवणी यामुळे जाग्या झाल्या.
पॅरिससाठी कालचा दिवस काळा शुक्रवार ठरला. रस्ते रक्ताने माखले. एके-४७ स्वयंचलित बंदुका, हातबाँब, कमरेवर बांधलेले स्फोटकांचे पट्टे अशा शस्त्रास्त्रांनिशी पूर्ण तयारीने आलेल्या दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये मृत्यूचे थैमान घातले. ल बाटाक्लॅन या नाटय़गृहात संगीत कार्यक्रम सुरू असताना काही हल्लेखोरांनी अचानक गोळाबार सुरू करून काही प्रेक्षकांना ओलीस ठेवले. काय होत आहे हे कळण्याच्या आत तेथे सुमारे ८० जणांचे प्राण गेले होते. तीन हल्लेखोरांनी आपल्या अंगावर बांधलेल्या स्फोटकांसह स्वत:ला उडवून दिले तर चौथा हल्लेखोर सुरक्षा दलांबरोबरील चकमकीत मारला गेला. याशिवाय अन्य सहा ठिकाणीही हल्ले झाले.
ल बेले इक्वीप, ल कॉरिलॉन, ल पेटीट कॅमबोजे, ल कॉरिलॉन आणि ल कॅसा नोस्ट्रा या उपाहारगृहामध्येही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. आठ दहशतवादी मारले गेले आहेत. एका अतिरेक्याच्या मृतदेहाजवळ सीरियाचे पारपत्र (पासपोर्ट) सापडले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The terrorist attacks on the paris
First published on: 15-11-2015 at 04:18 IST