PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी तामिळनाडूमधील तब्बल ४,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन पार पडलं. जागतिक दर्जाच्या हवाई पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४५० कोटींच्या खर्चासह विकसित केलेल्या तुतीकोरिन विमानतळ टर्मिनलच्या इमारतीचे उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तामिळनाडूमध्ये अभूतपूर्व विकासाबाबत भाष्य केलं. तसेच पंतप्रधान मोदी नुकतेच विदेश दौऱ्यावर होते. या दौऱ्यात झालेल्या भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारावरही मोदींनी भाष्य केलं. बहुतांश उत्पादनांना ब्रिटिश बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश या करारामुळे मिळणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारामुळे जगाचा भारतावरील विश्वास आणि देशाचा आत्मविश्वास दर्शवित असल्याचं सांगत मुक्त व्यापार कराराचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“आज आपण आपल्या प्रयत्नांद्वारे विकसित तामिळनाडू आणि विकसित भारताचं स्वप्न पुढे नेत आहोत. नुकतंच ब्रिटन आणि भारत यांच्यात एक मुक्त व्यापार करार झाला आहे. जो या स्वप्नाला गती देतो. या करारामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेलाही नवीन बळकटी मिळेल. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची आपली गती आणखी वेगवान होईल”, असं मोदींनी म्हटलं आहे.

“तामिळनाडूच्या विकासासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. तामिळनाडूमध्ये आम्ही विमानतळांसह विविध महामार्गांचा विकास करत आहोत. आज केलेल्या उद्घाटनांची कामे हे देखील याचाच एक भाग आहे. १७,३४० चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेले हे टर्मिनल गर्दीच्या वेळी १,३५० प्रवाशांना आणि दरवर्षी २० लाख प्रवाशांसाठी सुसज्ज असेल. तामिळनाडूचा विकास ही आमची मुख्य वचनबद्धता आहे. राज्याच्या प्रगतीशी संबंधित धोरणांना सातत्याने प्राधान्य दिलं गेलं. गेल्या दशकात केंद्र सरकारने मागील यूपीए सरकारच्या काळात दिलेल्या निधीच्या तुलनेत तिप्पट जास्त निधी तामिळनाडूला दिला”, असं मोदींनी म्हटलं आहे.

‘आजही दहशतवाद्यांच्या आकाची झोप उडालेली’ : पंतप्रधान मोदी

“आज भारत सरकार मेक इन इंडिया आणि मिशन मॅन्युफॅक्चरिंगवर जोरदार भर देत आहे. तुम्ही सर्वांनी अलीकडेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान ‘मेक इन इंडिया’ची शक्ती पाहिली आहे. भारतात बनवलेल्या शस्त्रांनी दहशतवाद्यांची अड्ड्ये नष्ट करण्यात मोठी भूमिका बजावली. भारतात बनवलेल्या शस्त्रांमुळे अद्याप देखील दहशतवाद्यांच्या आकाची झोप उडालेली आहे”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.