Mohan Bhagwat On Relation Between RSS And BJP: राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या शताब्दीनिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी सत्ताधारी भाजपासोबतच्या संघाच्या समन्वयाबद्दल बोलताना स्पष्ट केले की, सरकारशी मतभेद आहेत पण भांडण नाही.

व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी भारताच्या भविष्याबद्दलचे त्यांचे दृष्टिकोन आणि त्याला आकार देण्यात स्वयंसेवकांची भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी भारतातील शिक्षणावर भाष्य केले.

संघर्ष होऊ शकतो, पण…

सत्ताधारी भाजपासोबतच्या संघाच्या समन्वयाबद्दल बोलताना, मोहन भागवत म्हणाले की संघर्ष होऊ शकतो, पण भांडण नाही. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, “कुठेही भांडण नाही, पण सर्व मुद्द्यांवर एकमत होणे शक्य नाही; आम्ही नेहमीच एकमेकांवर विश्वास ठेवतो. मी ‘शाखा’ चालवण्यात तज्ज्ञ आहे, भाजपा सरकार चालवण्यात तज्ज्ञ आहे. त्यामुळे आम्ही फक्त एकमेकांना सूचना देऊ शकतो.”

खुर्चीवर बसलेला माणूस आमच्यासाठी…

भागवत पुढे म्हणाले की, “जरी खुर्चीवर बसलेला माणूस आमच्यासाठी १०० टक्के असला तरी, त्याला माहित आहे की अडथळे काय आहेत आणि आपण त्याला ते स्वातंत्र्य दिले पाहिजे”.

“आमचा प्रत्येक सरकारशी, राज्य सरकारांशी आणि केंद्र सरकारशी चांगला समन्वय आहे. परंतु अशा काही व्यवस्था आहेत ज्यात काही अंतर्गत विरोधाभास आहेत. सर्वसाधारणपणे व्यवस्था तीच आहे, जी ब्रिटिशांनी राज्य करण्यासाठी शोधून काढली होती. म्हणून, आपल्याला काही नवोपक्रम करावे लागतील”, असेही मोहन भागवत यांनी नमूद केले.

संस्कृत भाषा सक्तीची करावी का?

संस्कृत भाषा सक्तीची करावी का या प्रश्नाचे उत्तर देताना भागवत म्हणाले, “प्रत्येकाला आपले ज्ञान, परंपरा समजून घेण्यासाठी संस्कृतचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. ते सक्तीची करण्याची गरज नाही. परंतु, खऱ्या अर्थाने भारत समजून घेण्यासाठी, संस्कृतचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ती इच्छा निर्माण करणे आवश्यक आहे.”

मोठ्या प्रमाणात जनजागृती म्हणून, संघाने त्यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून देशभरात एक लाखाहून अधिक ‘हिंदू संमेलने’सह अनेक कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली आहे, ज्याची सुरुवात भागवत यांनी या वर्षी २ ऑक्टोबर रोजी विजया दशमीला नागपूर येथील संघ मुख्यालयातीस भाषणापासून होणार आहे.