गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष कंबर कसताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून केवडिया येथे दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीस आज केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत भाजपाने आगामी निवडणुकीत विजयी होण्याच्यादृष्टीने विविध मुद्यांवर चर्चा केली. तर, यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची स्तुती देखील केली. ”मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही.”, असं राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलून दाखवलं. या बैठकीस गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची देखील उपस्थिती होती.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, देशात एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रातील भाजपा सरकारला दहशतवादी घाबरत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

तसेच, यावेळी त्यांनी काँग्रेवर टीका करताना म्हटले की, काँग्रेस पक्ष हा सैन्य दलातील जवानांबद्दल पुरेसा संवेदनशील नाही. कारण, त्यांनी वन रँक-वन पेन्शन (OROP)चा मुद्दा ४० वर्षांपासून रखडवला.

तसेच, “काहीही झाले तरी आम्ही दहशतवाद्यांना यशस्वी होऊ देणार नाही. जम्मू -काश्मीरला विसरून जा, मोदींच्या आगमनानंतर देशाच्या कोणत्याही भागात मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही. ही आमची मोठी कामगिरी आहे. असे दिसते की आता दहशतवाद्यांना भाजपा सरकारची भीती वाटते आहे. ही छोटी गोष्ट नाही, ” असंही राजनाथ सिंह म्हणाले.