सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपटावर अजून केंद्रीय प्रमाणन मंडळाची मान्यता मिळणे बाकी असतानाच्या स्थितीत आम्ही त्यावर कुठलाही आदेश जारी करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे.
मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, की जर याचिकाकर्त्यांनी या चित्रपटात अधिकच आक्षेपार्ह असे काही असल्याचे पुरावे सादर केले तर मंगळवारी त्यावर सुनावणी करून आदेश जारी करता येतील.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी काँग्रेस कार्यकर्ते अमन पनवर यांच्या याचिकेवर तातडीने आदेश जारी करण्यास नकार दिला. या चित्रपटाची प्रत आपल्याला देण्यात यावी ही याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळण्यात आली. एखाद्या व्यक्तीला या चित्रपटाची प्रत देण्याचा आदेश आम्ही का जारी करावा असा सवाल न्या. दीपक गुप्ता व संजीव खन्ना यांनी केला आहे. असा आदेश का म्हणून द्यावा या मागचे कारण आम्हाला समजत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सरन्यायाधीशांनी सांगितले,की चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने अजून मोदींवरील या चित्रपटास प्रमाणपत्र दिलेले नाही.या चित्रपटाला अजून प्रमाणपत्र दिले नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी पीटीआयला सांगितले होते. चित्रपटाची छाननी करूनच त्याला प्रमाणपत्र दिले जाईल असे जोशी यांनी म्हटले होते.