करोनाच्या ‘बी १.६१७’ उत्परिवर्तनाबाबत स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोविड १९ बाबत गैरमाहितीचा मुकाबला करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून विषाणू उपप्रकाराचा उल्लेख ‘भारतीय विषाणू’ असा करू नये. तसा उल्लेख असलेला आशय काढून टाकण्यात यावा, असे सरकारने समाजमाध्यम कंपन्यांना बजावले आहे.

भारतीय विषाणूचा उपप्रकार घातक असून तो जगात पसरण्याचा धोका आहे असा उल्लेख करण्यात आल्यावरून आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. डिजिटल माध्यमांनी म्हटले आहे, की सरकारची सल्लासूची आम्हाला काल प्राप्त झाली आहे.

शुक्रवारी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व समाजमाध्यमांना असे कळवले होते, की जागतिक आरोग्य संघटनेने बी १.६१७ या विषाणूचा उल्लेख भारतीय विषाणू उपप्रकार असा केलेला नाही. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे, की जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय विषाणू असा उल्लेख कुठेही केला नसताना ऑनलाइन पातळीवर त्याचा उल्लेख भारतीय विषाणू असा करण्यात आला होता. भारतीय विषाणू उपप्रकार जगभरात पसरत असल्याचे सरसकट विधान त्या वेळी ऑनलाइन माध्यमांनी केले होते.

माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने असे म्हटले आहे, की या मुद्दय़ावर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १२ मे २०२१ रोजी पूर्णपणे स्पष्टीकरण केले आहे. समाज माध्यम मंचांना असे सांगण्यात आले आहे,की बी १.६१७ या विषाणूला भारतीय विषाणू उपप्रकार संबोधण्यात आले आहे असा सर्व मजकूर काढून टाकण्यात यावा, कारण तो विषाणू  भारतीय उपप्रकार नाही. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने असे म्हटले होते, की करोना विषाणूबाबत समाजमाध्यमांनी चुकीची माहिती पसरवू नये. चुकीच्या बातम्या व चुकीची माहिती समाज माध्यमांवरून प्रसारित करणे योग्य नाही.

भारतीयांवरील प्रवासबंदीला कॅनडाची मुदतवाढ

ओटावा : भारत व पाकिस्तान या देशातून येणाऱ्या लोकांसाठी लागू केलेली प्रवासबंदी कॅनडाने वाढवली असून २१ जूनपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. कोविड १९च्या नवीन विषाणू प्रकारांचा प्रसार होऊ नये यासाठी ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. भारत व पाकिस्तानातून येणाऱ्या प्रवाशांवर आधी तीस दिवसांची बंदी २२ एप्रिल रोजी लागू करण्यात आली होती. ती शनिवारी संपली आहे त्यामुळे त्यात वाढ करण्यात आल्याचे कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने म्हटले आहे. मालवाहतूक मात्र सुरू राहणार असून लशी, व्यक्तिगत सुरक्षेचे सामान यांना त्यात परवानगी राहणार आहे.

कॅनडाच्या वाहतूक मंत्र्यांच्या मते हवाई सुरक्षा ही लोकांचे विषाणूपासून रक्षण करण्यासाठी महत्त्वाची राहणार आहे. भारत व पाकिस्तान या देशातून त्रयस्थ मार्गाने येणाऱ्या विमानांवर ही बंदी लागू राहणार नाही. पण त्यांना कोविड १९ निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे, त्यानंतरच त्यांना कॅनडात प्रवेश दिला जाणार आहे. वाहतूक मंत्री ओमर अलघाब्रा यांनी सांगितले, की सार्वजनिक आरोग्याचे हित लक्षात घेऊन जोखीम टाळण्यासाठी हा आदेश जारी केला आहे कारण कोविड १९ विषाणूचे काही प्रकार घातक ठरत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या कोविड १९ रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. कॅनडात सध्या असलेले ७० टक्के रुग्ण हे काळजी वाटत असलेल्या विषाणूचे असल्यामुळे प्रवास र्निबध आवश्यक होते, असे कॅनडाचे उप मुख्य सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. हॉवर्ड नजो यांनी सांगितले. बी.१.६२१७ हा उपप्रकार भारतात सापडला होता नंतर कॅनडात २७९ हवाई प्रवाशांमध्ये तो २२ फेब्रुवारी व  ६ मे दरम्यान सापडला होता, असे सार्वजनिक आरोग्य संस्थेने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no indian subtype of the virus ssh
First published on: 23-05-2021 at 00:42 IST