BJP First Candidate List LS polls : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असताना भाजपाने १६ राज्यातून १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत अनेक बदल केल्यामुळे ही यादी चांगलीच चर्चेत आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात भोजपुरी गायक पवन सिंह यांना उमेदवारी दिली गेली, मात्र त्यांनी आज अचानक माघार घेतली. तर दिल्लीच्या चांदणी चौक येथून माजी मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी आज थेट राजकारणातून निवृत्ती घेतली. फक्त डॉ. हर्षवर्धनच नाही तर इतरही अनेक नेत्यांना भाजपाने तिकीट नाकारले आहे. यामध्ये त्या खासदारांचाही समावेश आहे, ज्यांनी आपल्या कार्यकाळात भडकाऊ, चिथावणीखोर विधानं करून भाजपाला अडचणीत आणले होते.
लोकसभेसाठी तिकीट कापल्यानंतर माजी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजकारणालाच राम-राम
इतर खासदारांसाठी सूचक इशारा
भाजपाने पहिल्या यादीत काही प्रमुख खासदार जसे की, प्रज्ञा सिंह ठाकूर, रमेश बिधुरी आणि प्रवेश वर्मा यांना तिकीट नाकारले आहे. तसेच जयंत सिन्हा आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनाही उमेदवारी दिलेली नाही. मात्र जयंत सिन्हा आणि गौतम गंभीर यांनी यादी जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली होती. प्रज्ञा सिंह, रमेश बिधुरी आणि परवेश वर्मा यांनी आपल्या कार्यकाळात संसदेत आणि संसदेबाहेर अनेकदा अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. भाजपाने यांना तिकीट नाकारून निवडणुकीच्या काळात जोखीम न उलण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.
भाजपाला धक्का; उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांची निवडणुकीतून माघार
प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी होत्या. आरोपातून मुक्त झाल्यानंतर भाजपाने त्यांना निवडणुकीतून उतरवले होते, तेव्हाही भाजपावर जोरदार टीका झाली होती. गेल्या काही काळात त्यांच्या चिथावणीखोर विधानामुळे भाजपावर विरोधकांनी टीका केली होती. ठाकूर यांनी महात्मा गांधींवर गोळ्या झाडणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त असल्याचे म्हटले होते. या विधानावर विरोधकांसह मित्रपक्षांनीही आक्षेप घेतला होता.
माजी मुख्यमंत्री स्व. साहिब सिंह वर्मा यांचे सुपुत्र आणि दोन वेळा खासदार राहिलेल्या परवेश सिंह वर्मा यांचे तिकीट कापल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परवेश सिंह यांनीही अनेकदा वादग्रस्त विधानामुळे पक्षाला अडचणीत आणले होते. २०२० साली दिल्लीच्या शाहीन बाग येथे अल्पसंख्याक महिलांचे आंदोलन सुरू असताना परवेश सिंह वर्मा यांनी वादग्रस्त विधान केले होते. दिल्ली विधानसभेत भाजपाची सत्ता आल्यास आंदोलकांना एका तासात आंदोलनस्थळावरून हाकलून लावू, असे विधान त्यांनी केले होते.
दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. नव्या संसद भवनात मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. या अधिवेशनात रमेश बिधुरी यांनी बसपाचे तेव्हाचे खासदार दानिश अली यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली होती. ही शिवीगाळ संसदेच्या थेट प्रक्षेपणातही ऐकू आली होती. सभागृहात उपस्थित असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रसंगाचे गांभीर्य पाहून मध्यस्थी करत स्वतः माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.