देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. अनेक राज्यांमधील करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण पडला आहे. केंद्र सरकारने करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात देण्यात आलेला इशारा गांभीर्याने घेतला नाही म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. अशातच आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदी सरकारवर टीका करताना वैज्ञानिकांच्या इशाऱ्याकडून दुर्लक्ष करुन सरकार झोपा काढत राहिल्याचा टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओवेसी यांनी लसीकरण आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधलाय. “लसीकरण मोहिमेमध्ये केंद्राला अपयश आलं आहे. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनचा आणि लसींचा पुरवठा करण्यात केंद्राला अपयश आलं. लसींच्या वितरणाचा हक्क केंद्राकडे राखीव असल्याने असं घडलं. वैज्ञानिकांनी दुसऱ्या लाटेसंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतरही ते झोपून राहिले. सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे,” अशी टीका ओवेसी यांनी केलीय.

दोन दिवसांपूर्वीच ओवेसी यांनी देशातील सद्य परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार असल्याचं ट्विटरवरुन म्हटलं होतं. करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी ओवेसी यांनी केली होती. “पंतप्रधान संसद आणि पत्रकार परीषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तान बद्दल तासनतास बोलू शकतात, परंतु ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची मोदींनी माफी मागावी”, असे ओवेसी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भातील मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. भारतामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू होईल असं नुकतच द लॅन्सेटच्या अहवालात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेचं अधिवेशन भरवून चर्चा केल्यास सरकारला करोनाविषयक धोरणे ठरवण्यासाठी मदत होईल असं या पत्रात अधीर रंजन यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: They slept on their own scientists warning that 2nd wave will come but despite that the govt failed asaduddin owaisi scsg
First published on: 11-05-2021 at 09:26 IST